लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: जयंतराव सहस्रबुद्धे हे विज्ञानाप्रमाणे आयुर्वेदाचे मोठे अभ्यासक होते. गोव्यात वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस परिषद भरविण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्याकडून नव्या पिढीला खूप काही शिकण्यासारखे आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी गोवा विभाग प्रचारक जयंतराव सहस्रबुद्धे यांच्या श्रद्धांजली सभेत येथील इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, बिहारचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर, आमदार दिगंबर कामत, सुभाष वेलिंगकर, विज्ञान भारतीचे सुहास गोडसे, उद्योजक श्रीनिवास धेपे, भाजपचे कार्यकर्ते तसेच संघाच्या कार्यकर्त्यांनी आपले विचार व्यक्त केले.
जयंतराव सहस्रबुद्धे यांचे कार्य विज्ञान क्षेत्रात खूप मोठे आहे. विज्ञान क्षेत्रात देश खूप पुढे जावा यासाठी त्यांनी खूप कार्य केले आहे. तसेच देश आयुर्वेद जगात खूप पुढे जावा यासाठी त्यांनी मोठे कार्य केले आहे. विज्ञान फिल्म महोत्सव त्यांनी गोव्यात यशस्वीरीत्या आयोजित केला होता. त्यांचे कार्य हे कधीही न विसरण्यासारखे आहे. गोवा विभागाचे प्रचारक सहस्रबुद्धे यांनी गोव्यातही संघाचे काम खूप केले होते. सर्व स्वयंसेवकांना ते प्रिय होते, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
जयंतराव सहस्रबुद्धे यांनी विज्ञान क्षेत्रात मोठे कार्य केले आहे. गोव्यात विज्ञान भारतीतही त्यांचे मोठे कार्य आहे. त्यांनी आपल्या विचारांतून अनेक लोकांना घडविले आहे. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. त्यांचे कार्य विज्ञान क्षेत्रात सदैव आठवणीत राहील, असे विज्ञान भारती गोवाचे सुहास गोडसे यांनी यावेळी बोलताना सांगितले. सहस्रबुद्धे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उच्चशिक्षित जयंतराव १९९२ मध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई येथील नोकरी सोडून संघाचे प्रचारक म्हणून घरातून बाहेर पडले होते. ते आजन्म प्रचारक राहिले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वृद्धीबरोबरच संघ परिवारातील अन्य १७ संघटनांचे कार्य गोव्यात विस्तारित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांनीच गोव्यात विज्ञान भारतीचे काम उभे करून डिफेक्सो प्रदर्शन आयोजित केले होते.