राजकीय संकटातही गोव्याच्या मंत्र्यांकडून मुंबईत गणेश दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 12:03 PM2018-09-21T12:03:11+5:302018-09-21T12:12:37+5:30
राजकीयदृष्ट्या गोवा संकटात असल्यासारखी स्थिती आहे पण सरकारमधील काही मंत्र्यांना हे राजकीय विघ्न दूर होईल असे वाटते.
सदगुरू पाटील
पणजी - राजकीयदृष्ट्या गोवा संकटात असल्यासारखी स्थिती आहे पण सरकारमधील काही मंत्र्यांना हे राजकीय विघ्न दूर होईल असे वाटते. सरकारमधील गृहनिमार्ण खात्याचे मंत्री तथा गोवा फॉरवर्डचे नेते जयेश साळगावकर यांनी मुंबईत सहकुटूंब लालबागचा राजा व अन्य गणेशमूर्तीचे दर्शन घेतले. सरकारमधील अन्यही एक मंत्री मुंबई व बेळगावला जाऊन गणेश दर्शन घेऊन आले.
गोव्यात नेतृत्वाचा वाद निर्माण झालेला असून विरोधी काँग्रेस पक्ष सत्ताबदल करू पाहत आहे. काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक तथा गोव्याचे प्रभारी चेल्लाकुमार हे दोन दिवस गोव्यात ठाण मांडून आहेत. ते काँग्रेसच्या आमदारांच्या गटागटाने बैठका घेत आहेत. गोवा विधानसभेत जर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना बहुमत सिद्ध करायला सांगितले तर त्यांना ते सिद्ध करता येणार नाही, असे काँग्रेसला वाटते. कारण भाजपाचे दोन मंत्री रुग्णालयात आहेत. शिवाय खुद्द मुख्यमंत्री पर्रीकर हेही दिल्लीतील एम्स रुग्णालयात असून तिथे त्यांना कुणी भेटूही शकत नाहीत.
पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी भाजपाप्रणीत आघाडीचा भाग असलेल्या गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे कृषी मंत्री विजय सरदेसाई आणि मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते व बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांच्यात मोठा वाद आहे. या सगळ्या पार्श्भूमीवर गोव्यात राजकीय अस्थैर्य निर्माण झालेले आहे. प्रशासन तर ठप्प असून मंत्र्यांना मोठेसे काम राहिलेले नाही. मंत्रिमंडळाच्या बैठका होत नाहीत. मंत्री सरदेसाई हे तर गेले दीड महिना मंत्रालयातील आपल्या केबिनमध्येही आलेले नाहीत. मंत्री सरदेसाई यांनी लोकमतला नुकतेच सांगितले, की आम्ही सध्या गणोशोत्सवाच्या सुट्टीमध्ये असून कोणत्याच राजकीय लॉबींगमध्ये भाग घेत नाही.
दरम्यान, मंत्री साळगावकर हे मंत्री सरदेसाई यांच्याच पक्षातील महत्त्वाचे मंत्री आहेत. त्यांनी गुरुवारी मुंबई गाठली व मुंबईत गणेश दर्शन घेतले. गोव्यात पाच दिवसांचा गणोशोत्सव झाला की, अनेक गोमंतकीय मुंबई व बेळगावला जाऊन तिथे गणेश मूर्ती पाहण्याचा आनंद घेतात. मंत्री साळगावकर यांनी लोकमतला सांगितले, की आपण सहकुटूंब मुंबईला जाऊन लालबागचा राजा पाहिला. आमचे सरकार स्थिर आहे. त्यामुळे टेन्शन नाही.