- सद्गुरू पाटील
देवेंद्र फडणवीस ५३ वर्षांचे आहेत तर गोव्याचे मुख्यमंत्री सावंत हे ५० वर्षांचे आहेत. हेमंत बिस्वा शर्मा हे ५४ वर्षे वयाचे आहेत. एकंदरीत अजून वयाची ५५ वर्षे न ओलांडलेले हे तिन्ही नेते भविष्यात भाजपसाठी आणखी मोठी कामगिरी करणारे ठरू शकतात.
मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे पंधरा दिवसांपूर्वी दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शाह यांना व्यक्तीश: भेटले होते. त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत कर्नाटकचे नेते देवेगौडा यांना नेले होते. ही बातमी मला कळली तेव्हा आश्चर्य वाटले होते. कुमारस्वामी यांचा कर्नाटकमधील जेडीएस पक्ष एनडीएमध्ये सहभागी होईल अशी कुणकुण त्यावेळी लागली होती. मात्र मुख्यमंत्री सावंत यांनी देवेगौडा यांना सोबत घेऊन शहा यांची भेट घेतली ही गोष्ट खरी आहे की केवळ अफवा आहे अशी शंका मनात आली होती. कारण कुमारस्वामी यांच्या पक्षाला मुख्यमंत्री सावंत हे एनडीएसोबत कसे काय आणतील व त्यांचा संबंध काय असा प्रश्न काहीजणांच्या मनात आला होता. मात्र राजकारणात विविध चाली खेळाव्या लागतात. विविध स्तरावरील संबंध व कनेक्शन्स वापरावी लागतात. तरच राजकारणात यशस्वी होता येते. काँग्रेस पक्ष अलिकडे अशा खेळीबाबत कमी पडत आहे. कुमारस्वामी यांचा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होण्यास तयार झाला. या प्रक्रियेत गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी देखील आपले योगदान दिले हे मान्य करावे लागेल.
शुक्रवारी जेडीएस नेते कुमारस्वामी यांच्यासोबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची बैठक झाली. त्यावेळी जेडीएसच्या एनडीएमधील सहभागावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा त्या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री सावंतही उपस्थित होते. आपण देखील या नव्या युतीच्या स्थापनेत थोडी भूमिका पार पाडली असे मुख्यमंत्री सावंत यांनीही मीडियाशी बोलताना नमूद केले. लोकसभा निवडणुकीत भाजपला कुमारस्वामी यांच्या पक्षाची मोठी मदत होणार आहे. दक्षिणेत व विशेषत: कर्नाटकात काँग्रेसला शह देण्यासाठी जेडीएस पक्ष भाजपला उपयुक्त ठरेल हे वेगळे सांगायला नको. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला. त्यानंतर भाजपला कर्नाटकात जेडीएसच्या मैत्रीची गरज होतीच. जेडीएसला आपण जवळ करावे असे भाजपच्या केंद्रीय नेत्यांना वाटत होतेच. शेवटी मार्ग सापडला. कुमारस्वामी यांनी कधी भाजपला तर कधी काँग्रेसला आपला शत्रू मानला हे दाखले यापूर्वीच्या राजकीय इतिहासात सापडतातच, आता नव्याने भाजपसोबत जेडीएसचा संसार सुरू झाला आहे असे म्हणता येते.
कर्नाटकात लोकसभेच्या एकूण २८ जागा आहेत. २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत कर्नाटकात कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षाने एकूण ३७ जागा जिंकल्या होत्या. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीत मात्र हा पक्ष फक्त १९ जागा जिंकू शकला. जेडीएसचे महत्त्व कमी झाले पण भाजपशी हातमिळवणी करणे हे कुमारस्वामी यांच्यासाठी आजच्या घडीस फायद्याचे आहे. भाजपसाठीही युती लाभदायी आहे. कर्नाटकमधील काँग्रेससाठी काही प्रमाणात तरी ही नवी युती चिंताजनक आहे. १९९९ साली जेडीएस पक्षाची स्थापना झाली होती. एनडीएमध्ये सहभागी झाल्यानंतर आपले भवितव्य पुन्हा उज्ज्वल बनेल असे कुमारस्वामी यांना वाटत असावे.
कुमारस्वामी हे आज ६३ वयाचे आहेत तर त्यांचे वडील माजी पंतप्रधान देवेगौडा ९० वर्षांचे आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांच्यावर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा विश्वास वाढत आहे. सावंत यांना कर्नाटकमध्येही निवडणूक प्रचारावेळी महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली होती. आता राजस्थान व मध्य प्रदेशमध्येही मुख्यमंत्री सावंत यांनी भाजपच्या कामात योगदान देणे सुरू ठेवले आहे. विशेषत: राजस्थानमध्ये मुख्यमंत्री सावंत यांच्या विविध सभा होऊ लागल्या आहेत. त्या सभांना प्रतिसादही चांगला मिळतोय. विविध राज्यांतील आपल्या मुख्यमंत्र्यांना देशभरातील निवडणुकांसाठी कमी- अधिक प्रमाणात प्रचार कामासाठी उपयोगात आणणे ही भाजपची योजना प्रभावी असते. कोणत्या नेत्याकडे कोणते कौशल्य आहे, हे हेरून त्यानुसार त्यांचा वापर पक्ष कामासाठी केला जातो.
ज्या राज्यात भाजपकडे मुख्यमंत्री आहेत किंवा विरोधी पक्षनेते आहेत, त्या राज्यातील सीएम किंवा विरोधी पक्षनेत्याला अन्य राज्यात प्रचारासाठी पाठवले जाते. तुम्ही दोन महिने आता अन्य राज्यात पक्षाच्याच कामासाठी द्यायला हवेत, आपल्याला निवडणुका जिंकायच्या आहेत असा संदेश केंद्रीय नेतृत्वाकडून दिला जातो. यावेळीही मुख्यमंत्री सावंत किंवा मंत्री विश्वजित राणे यांनाही तसा संदेश दिला गेला आहे. मध्य प्रदेशमधील पाच विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी विश्वजितवर दिली गेली आहे. मात्र मुख्यमंत्री सावंत यांची जबाबदारी त्याहून मोठी आहे. सावंत यांच्याकडे प्रभावी भाषण करण्याची कला आहे. अन्य राज्यांत पक्ष कामासाठी जाणाऱ्या नेत्यांना मोठा एक्सपोजर मिळतो.
गोवा विधानसभा निवडणुकीवेळी गेल्यावर्षी महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीस गोव्यात आले होते. त्यांनी गोव्यात महिनाभर तळच ठोकला होता. भाजपला गोवा निवडणुकीत जे यश मिळाले त्यात फडणवीस यांचाही वाटा आहे. फडणवीस किंवा प्रमोद सावंत किंवा आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा हे भाजपसाठी फार मोठे असेट्स आहेत. मुख्यमंत्री सावंत यांचे वय अन्य दोन नेत्यांपेक्षा कमी आहे. देवेंद्र फडणवीस ५३ वर्षांचे आहेत तर मुख्यमंत्री सावंत ५० वर्षांचे आहेत. हेमंत बिस्वा शर्मा हे ५४ वर्षे वयाचे आहेत. एकंदरीत अजून वयाची ५५ वर्षे न ओलांडलेले हे तिन्ही नेते भविष्यात भाजपसाठी आणखी मोठी कामगिरी करणारे नेते ठरू शकतात. हेमंत बिस्वा शर्मा हे कॉंग्रेसमधून भाजपमध्ये आले आहेत तर सावंत व फडणवीस हे मूळ भाजपमधीलच आहेत.
शुक्रवारी जेडीएस नेते कुमारस्वामी यांच्यासोबत भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची बैठक झाली. त्यावेळी जेडीएसच्या एनडीएमधील सहभागावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ही प्रक्रिया पूर्ण झाली तेव्हा त्या बैठकीला गोव्याचे मुख्यमंत्री सावंतही उपस्थित होते. आपण देखील या नव्या युतीच्या स्थापनेत थोडी भूमिका पार पाडली असे मुख्यमंत्री सावंत यांनीही मीडियाशी बोलताना नमूद केले.