मडगाव: दोन वर्षापूर्वी सावर्डे येथे पूल दुर्घटनेच्यावेळी साहसी कामगिरी करुन किमान 15 जणांचा जीव वाचविण्याची कामगिरी करणारा कुडचडे पोलीस स्थानकाचा हवालदार अविनाश नाईक यांना दीड लाखांचा उत्तम जीवनरक्षा पुरस्कार प्राप्त झाला असून दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी मंगळवारी नाईक यांना या पुरस्काराचा धनादेश भेटविला.
जीवनरक्षा पदक नाईक यांना राज्यस्तरीय सोहळ्यात लवकरच देण्यात येईल अशी माहिती गावस यांनी दिली. नाईक यांची कामगिरी निश्चितच गौरवास्पद असून त्यामुळे गोवापोलिसांचीही शान वाढली आहे, असे गावस म्हणाले. सदर दुर्घटना 18 मे 2017 या दिवशी घडली होती. सावर्डेच्या जुवारी नदीत एका इसमाने आत्महत्या केल्याने त्याचा शोध घेणा-या अग्नीशमन दलाच्या पथकाला पहाण्यासाठी लोकांनी सावर्डेच्या जुन्या पुलावर गर्दी केली होती. लोकांच्या गर्दीने हा पूल तुटल्याने सुमारे 40 लोक पाण्यात पडले होते. त्यावेळी नदीच्या काठी असलेल्या हवालदार नाईक याने क्षणाचाही विलंब न करता पाण्यात उडी घेत सुमारे 15 जणांना काठावर आणले होते. याच कामगिरीसाठी त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले आहे.
नाईक यांच्या या कामगिरीबद्दल सांगताना गावस म्हणाले, सावर्डेची ही नदी खोल असून त्यात पोहायलाही जाणो धोक्याचे आहे. असे असतानाही अविनाश नाईक यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांचे जीव वाचविले. या घटनेबद्दल विचारले असता नाईक यांनी तो प्रसंगच डोळ्यासमोर उभा केला. ते म्हणाले, जे शोधकार्य चालू आहे ते पहाण्यासाठी मी नदीच्या काठी उभा होतो. एवढय़ात पुल कोसळून लोक पाण्यात पडत आहेत हे पाहिल्यावर मी पाठचा पुढचा विचार न करता पाण्यात उडी घेतली. मी पंटेमळ-कुडचडे या भागातील असल्याने माङो सर्व बालपण या नदीवरच गेले आहे. त्यामुळे या नदीचा सगळा ठाव ठिकाणा मला माहीत होता. लहानपणापासून मी उत्कृष्ट पोहणारा होतो. त्यामुळेच मी नदीत उडी घेतली. माझ्यामुळे पंधरा जणांचे प्राण वाचले हेच माझ्यासाठी सर्वात मोठे पदक होते.