पणजी : 'नोकरीकांड प्रकरणी जे विरोधक माझ्या पत्नीवर बिनबुडाचे आरोप करीत आहेत, त्यांच्या विरोधात बदनामीचे खटले दाखल करीन, असा सज्जड इशारा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल रात्री उशिरा दिला. दाबोळी विमानतळावर उतरताच त्यांनी पत्रकारांना संबोधले. गोव्यात गेले काही दिवस नोकऱ्या विक्रीचे प्रकरण गाजत आहे. आपल्या पत्नीवर नाहक आरोप केले जात असल्याचे ते म्हणाले. 'ज्यांनी माझ्या पत्नीवर निराधार आरोप केलेले आहेत, त्यातील एकही जण सुटणार नाही. प्रत्येकाला नोटिसा जातील असे मुख्यमंत्री म्हणाले.
ते म्हणाले की 'ज्यांनी नोकऱ्यांसाठी पैसे दिलेले आहेत आणि फसवले गेलेले आहेत त्यांनी पोलिसात तक्रारी दिलेल्या आहेत आणि फसवणूक केलेल्यांना अटकही झालेली आहे. सुरुवातीला मीच या प्रकरणात पूजा नाईक हिला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस पारदर्शक पद्धतीने तपास करीत आहेत. विरोधकांकडे कोणतेच मुद्दे नाहीत त्यामुळे सुरुवातीला ते माझ्यावर आरोप करत होते. परंतु आता ते माझ्या पत्नीवर घसरले आहेत.
माझी पत्नी भाजपाचे काम करते. राजकारणात आहे परंतु सरकारच्या कामात तिनी कधीही हस्तक्षेप केलेला नाही. विरोधकांना सरकारचे सुरळीतपणे चाललेले काम पहावत नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारचे आरोप करत आहेत. जे बिनबुडाचे आरोप करतात त्या कोणालाही मी सोडणार नाही. कायद्याने जी कारवाही करणे शक्य आहे ती करीन. प्रत्येकाला कोर्टाच्या नोटिसा जातील.'
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, राज्यात पारदर्शक पद्धतीने नोकर भरती व्हावी यासाठी मीच कर्मचारी निवड आयोग आणला. आता भरतीत पारदर्शकता आली त्यामुळे ज्यांनी कुणाला पैसे दिलेत ते तक्रार करायला पुढे येत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांचे नाव न घेता ते म्हणाले की, 'अबकारी घोटाळा प्रकरणात जे जामिनावर सुटलेले आहेत त्यांनी इतरांवर आरोप करू नयेत. मी कोणालाही सोडणार नाही. सर्वांविरुद्ध अब्रू नुकसानीचा खटला दाखल करणार आहे.'
दरम्यान, गेले काही दिवस राज्यात गाजत असलेल्या या प्रकरणात आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह तसेच स्थानिक नेत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे नाव घेऊन त्या या प्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप केला होता. काँग्रेसनेही दिल्लीत पत्रकार परिषद घेत अशाच प्रकारचे आरोप केले होते. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी कोणाचेही नाव न घेता या प्रकरणात 'मॅडम' सूत्रधार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर प्रथमच मुख्यमंत्र्यांनी विरोधकांचा समाचार घेत बदनामीच्या खटल्याचा इशारा दिलेला आहे.