बांधकाम खात्यात नोकर भरती नव्हे तर 'नोकरी विक्री'; काँग्रेसचा अभियंत्यांना घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2023 12:14 PM2023-06-06T12:14:59+5:302023-06-06T12:15:06+5:30
कोट्यवधींच्या घोटाळ्याचा दावा
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सार्वजनिक बांधकाम खात्यात कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक पदांसाठी परीक्षा होणार आहे. ही नोकर भरती नसून, ती नोकरी विक्री'चा प्रकार असून, हा घोटाळा १४० कोटी रुपयांचा असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
या कथित नोकर भरती विरोधात प्रदेश युवक काँग्रेस समिती व एनएसयुआयच्या शिष्टमंडळाने सोमवारी बांधकाम खात्यावर धडक मोर्चा नेऊन मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांना घेराव घातला. खात्याकडून होणारी नोकर भरती प्रक्रिया ही पारदर्शक असावी, यासाठी राज्य कर्मचारी निवड आयोगामार्फत करावी, अशी मागणी काँग्रेसने यावेळी केली.
यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा म्हणाले की, २०२१ मध्ये बांधकाम खात्यात झालेल्या नोकर भरतीत तत्कालीन मंत्र्यांचा हात आहे. हा घोटाळा ७० कोटी रुपयांचा असल्याचा आरोप मंत्री बाबूश मोन्सेरात यांनी केला होता. मात्र, आता याच खात्यात पुन्हा एकदा कनिष्ठ अभियंता व तांत्रिक सहायक पदासाठी परीक्षा होणार आहे. यापैकी कनिष्ठ अभियंता पदावर उमेदवार यापूर्वीच निश्चित झाले असून, परीक्षा ही केवळ औपचारिकता आहे. सर्व पदे फिक्स असून, या घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याचा आरोप त्यांनी केला.
एनएसयुआयचे अध्यक्ष नौषाद चौधरी म्हणाले की, २०२१ मधील नोकर भरती प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप झाल्यानंतर ही भरती स्थगित केली होती. मात्र, आता नव्याने काढलेल्या जाहिरातीनुसार या दोन्ही पदांसाठी परीक्षा होत असल्याने नुकतेच अभियांत्रिकी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा ही परीक्षा देण्याची संधी द्यावी. यासाठी परीक्षेची तारीख पुढे ढकलावी, अशी मागणी त्यांनी केली.
न्यायालयीन समिती स्थापन करा
२०२१ मध्ये बांधकाम खात्यात झालेल्या कथित नोकर भरती प्रक्रियेची चौकशी एक फार्स होता. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. नोकर भरती मुद्द्यावरून गोमंतकीय युवकांच्या भावनांशी सरकारने खेळू नये, असा इशारा काँग्रेसने दिला आहे.