लोकमत न्यूज नेटवर्क, पेडणेः स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानातून देश स्वतंत्र झाला. १९५७ साली गोवा मुक्तीसाठी देशातील वेगवेगळ्या प्रांतांमधून स्वातंत्र्यसैनिकांची आणि त्यांची एक तुकडी पत्रादेवी या ठिकाणी आली आणि त्यांनी गोवामुक्तीसाठी बलिदान दिले. त्यांचे स्मरण करणे आणि गोवामुक्तीसाठी ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी लढ्यात सहभाग घेतला, आपले बलिदान दिले त्यांतील काही हयात आहेत, काही नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना, त्यांच्या सदस्यांना येणाऱ्या वर्षभरात शंभर टक्के शासकीय नोकऱ्या देऊन गौरव केला जाईल, असे उद्गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काढले.
पत्रादेवी येथील हुतात्मा स्मारकाजवळ पुष्पांजली आणि ध्वजारोहण केल्यानंतर स्वातंत्र्यदिनाच्या राष्ट्रीय उत्सवात प्रमुख पाहणे या नात्याने ते बोलत होते. यावेळी पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, स्वातंत्र्यसैनिक संजय प्रभुदेसाई, सरपंच प्रार्थना मोटे, पेडणेचे नगराध्यक्ष सिद्धेश पेडणेकर, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, हुतात्मा स्मारकाचे सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. मागच्या काही काळात तांत्रिक समस्यांमुळे या कामात अडचणी आल्या. मात्र, दि. १९ डिसेंबरपर्यंत हे काम पूर्ण करून त्याच दिवशी लोकार्पण करण्यात येईल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. माहिती अधिकारी श्याम गावकर यांनी सूत्रसंचालन केले. बाल भवन केंद्राच्या विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व देशगीत सादर करून देशभक्तिपर वातावरण निर्मिती केली. यावेळी आमदार प्रवीण आर्लेकर यांचे भाषण झाले.
नवभारत, स्वयंपूर्ण गोव्यासाठी सर्वांनी झटूया
विमानतळ, आयुष्य इस्पितळ असे अनेक प्रकल्प भूमिपुत्रांसाठी कार्यरत आहेत. त्यांचाही लाभ घ्यावा. मुख्यमंत्री या नात्याने गोव्याचा विकास आपण सातत्याने करत असल्याचेही ते म्हणाले. नवभारत, नवीन विकास, स्वयंपूर्ण गोवा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गोवा विकसित करण्यासाठी तमाम गोमंतकीय प्रशासकीय अधिकारी, सरपंच, पंच. नागरिकांनी सरकारच्या कार्यासाठी पाठिंबा देऊन नवभारत, नवगोवा निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे त्यांनी आवाहन केले. गोवा स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करुया. गोवा हिरवागार ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहूया आणि सोनेरी किरणांनी व्यापलेला गोवा आणि देशप्रेम जागृत करून प्रत्येकाने यात सहभागी होऊन काम करूया, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
हिरवे गुरुजींचे स्मारक लवकरच पूर्णत्वास
हिरवे गुरुजींच्या स्मारकाचे काम सुरु करण्यात येईल. त्याचेही अनावरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिल्यामुळे आम्हांला स्वातंत्र्य मिळाले आहे. ते ठेवण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया, असे आवाहन मुख्यमंत्री सावंत यांनी यावेळी केले.
बलशाली भारत बनवूया : श्रीपाद नाईक
भारत देश २०४७ मध्ये पूर्णपणे विकसित होऊन जगात नंबर एकचा असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. युवापिढीने देशाविषयीचे प्रेम जागृत करावे. भारत देश बलशाली बनवण्यासाठी संघटित होऊया, असे आवाहन केले.
२०४७ पर्यंत भारत जगात नंबर एक बनेल
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करूया. देश विकसित करण्यासाठी त्यांनी पाऊल टाकलेले आहे. देशाचा विकास केंद्र सरकार, राज्य सरकार झपाट्याने करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. २०४७ मध्ये भारत देश पूर्णपणे विकसित होऊन जगात नंबर वन असेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नाईक यांनी व्यक्त केला.