लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: खुनाचा आरोप असलेला जोधपूर येथील कुविख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचा गँगस्टर पवन सोळंकी याला पणजीत जेरबंद करण्यात आले आहे. पणजी पोलिसांनी जोधपूर पोलिसांच्या साहाय्याने त्याला पणजीतील एका कॅसिनोत पकडले.
राजस्थानमधील अनेक पोलिस स्थानकात गुन्हे नोंद असलेला आणि खुनाच्या प्रकरणात मोस्ट वॉन्टेड असलेला सोळंकी हा गोव्यात असल्याची माहिती जोधपूर पोलिसांना मिळाली होती. त्याचा वावर असलेली निश्चित असा जागा त्यांना समजल्यानंतर स्थानिक सरदारपूर पोलिस स्थानाकातील एक पथक पणजीत दाखल झाले. पणजी पोलिसांच्या सहाय्याने सापळा रचून त्याच्या मुसक्या आवळल्या. पथक पणजीत दाखल झाले तेव्हा सोळंकी पणजीतच एका कॅसिनोत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यामुळे कॅसिनोत शिरून त्याला पकडण्यात आले.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पकडला जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याने पळण्याचाही प्रयत्न केला. काही झटापटीही झाल्या; परंतु त्याला पोलिसांनी अटक केली. उत्तर गोव्याचे अधीक्षक निधीन वालसान यांनीही माहिती दिली.
पवन सोळंकी याच्या नावावर खूप गुन्हे आहेत; परंतु अलीकडे त्याने केलेला गुन्हा हा चाकूचा धाक दाखवून दरोडा घालण्याचा गुन्हा होता. ४ मार्च २०१३ रोजी तो आपल्या गँगसह एका खासगी कार्यालयात घुसला. कार्यालयातील माणसाला मारहाण करून त्याचे हात-पाय बांधून ठेवले आणि तेथून लाखो रुपये घेऊन तो पसार झाला होता. तेव्हापासून सरदारपूर पोलिस स्थानकाचे पोलिस त्याच्या मागावर होते.
धमकीचे व्हिडीओ पाठवून दहशत
पवन सोळंकीच्या राजस्थानमधील अनेक पोलिस स्थानकात वेगवेगळ्या कहाण्या आहेत. धमकीचे व्हिडीओ बनवून ते व्हायरल करण्याचाही त्याला नाद होता. खुनाच्या अनेक प्रकरणांत त्याचा संबंध असल्याचेही पोलिस रेकॉर्ड सांगतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"