रोजगार, विकासासाठीच भाजपामध्ये प्रवेश - बाबू कवळेकर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2019 07:50 AM2019-07-11T07:50:25+5:302019-07-11T07:53:19+5:30
'विरोधी पक्षनेता असलो तरी मी माझ्या मतदारसंघातील लोकांना रोजगार, विकासकामे याबाबत मी बांधील होतो.'
पणजी : विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी दहा आमदारांसह विधिमंडळ पक्ष भाजपामध्ये विलीन केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, 'विरोधात राहून मतदारसंघांतील लोकांची कामे होत नव्हती त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला.
ते म्हणाले की, 'मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या कामाचा गेल्या तीन महिन्यातील धडाका पाहिला. सावंत हे नवीन असूनही धडाकेबाज काम करीत आहेत. विरोधी पक्षनेता असलो तरी मी माझ्या मतदारसंघातील लोकांना रोजगार, विकासकामे याबाबत मी बांधील होतो. विरोधात राहून ही कामे झालीच नसती. आम्हाला लोकांना तोंड द्यावे लागते गेली अडीच वर्षे कोणतीच कामे झाली नाहीत आता सत्तेत राहून ती मार्गी लावून भाजपाचे हात बळकट करीन.' याचबरोबर, कवळेकर यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या कार्याचेही कौतुक केले. भाजपा श्रेष्ठींना भेटण्यासाठी सर्व दहा आमदार दिल्लीला जात आहोत, असे ते म्हणाले.
पर्वरी येथे विधानसभा संकुलात सभापतींच्या कार्यालयात काँग्रेस विधिमंडळ पक्ष भाजपात विलीन करण्यासंबंधीचे पत्र देण्यासाठी सायंकाळी काँग्रेसचे आमदार दाखल झाले. सभापती राजेश पाटणेकर यांच्याकडे त्यांनी पत्र दिले त्यावेळी त्यांच्यासोबत उपसभापती मायकल लोबो होते. भाजपच्या कोअर टीम मधील दत्तप्रसाद खोलकर,संजीव देसाई, सरचिटणीस सदानंद तानावडे हे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही उपस्थिती लावली. सभापतींना पत्र सादर करून हे सर्वजण सभापतींच्या दालनातून परतले.