नारायण गावस, पणजी: राज्यातील सर्व टॅक्सी चालकांनी गोवा टॅक्सी ॲपमध्ये सहभागी होऊन वेगवेगळ्या योजनांचा लाभ घ्यावा. हे ॲप पर्यटन क्षेत्रात आणखी भर घालणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले. गोवा पर्यटन खाते व पर्यटन महामंडळातर्फे टॅक्सी ॲपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचा हस्ते झाले.
यावेळी पर्यटनमंत्री राेहन खंवटे, पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष आमदार गणेश गावकर पर्यटन संचालक, सचिव व इतर पदाधिकारी उपस्थित होते. गोव्याला पर्यटन क्षेत्रात खूप पुढे आणायचे असेल तर बदलत्या तंत्रज्ञानाप्रमाणे पुढे जायला हवे. यासाठी टॅक्सी ॲप लाभदायक ठरणार आहे. गोव्याला दर्जेदार पर्यटक हवे आहे. या पर्यटकांमुळे गाेव्याचे नाव जगभर प्रसिद्ध होते. हा ॲप त्यांचा विश्वास संपादन करणार आहे. या ॲपमुळे सुरक्षित प्रवास, कमी खर्च तसेच वेळेची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
टॅक्सीवाल्यांसाठी विविध योजना
ज्या टॅक्सी चालकांना गोवा माईल्स नको आहे त्यांनी गोवा टॅक्सी ॲपमध्ये सहभागी व्हावे. हे ॲप तुम्हा सर्व टॅक्सी चालकांचे आहे. यात तुम्हाला कुठलेही नुकसान होणार नाही. या टॅक्सी ॲपमार्फत सर्व टॅक्सीचालकांच्या भविष्याचा विचार केला आहे. यात सहभागी झालेल्या टॅक्सी चालकांना विविध योजनांचा लाभ होणार आहे. टॅक्सी चालक वारल्यास त्याच्या पत्नीला नुकसान भरपाई मिळेल. ६० वर्षे झाल्यानंतर टॅक्सी चालकांना पेन्शन देण्याची याेजना आहे. तसेच मुलांचे लग्न समारंभ तसेच विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्ती अशी विविध याेजना त्यांच्यासाठी राबविल्या जाणार आहे. या संधीचा राज्यातील टॅक्सी चालकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
पर्यटकांना चांगली वाहतूक सेवा मिळणार
गोवा हा फक्त समुद्र किनाऱ्यांपुरती आता मर्यादित राहिलेला नाही. गाेव्यात आता ग्रामीण पर्यटन, हिंटर टुरिझम, इको टुरिझम अशा विविध पर्यटन क्षेत्रात पुढे जात आहे; पण गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना चांगली वाहतूक सेवा मिळणे गरजेचे आहे. यासाठी या टॅक्सी ॲपची सुरुवात केली आहे. या ॲपमध्ये सर्व टॅक्सी चालकांनी सहभागी व्हावे. गोवा ॲपला चांगला प्रतिसाद मिळत आहे; पण ज्या टॅक्सी चालकांना गोवा माईल्स ॲप नकाे आहे. त्यांनी गोवा टॅक्सी ॲपला सहभागी व्हावे, असे पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.