पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे ज्येष्ठ उपाध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांची नियुक्ती करावी, असे तत्त्वत: ठरले आहे. जुझे फिलिप डिसोझा यांचे नाव पक्षश्रेष्ठींच्या मंजुरीसाठी पाठवून द्यावे, असे राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या बुधवारी येथे झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले. राष्ट्रवादीचे समन्वयक प्रफुल्ल हेदे यांनी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मावळते प्रदेशाध्यक्ष नीळकंठ हळर्णकर हे बैठकीस उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादीचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असावेत, याविषयी चर्चा झाली. जुझे फिलिप डिसोझा व देवानंद नाईक यांनी आपण प्रदेशाध्यक्ष होण्यास तयार असल्याचे सांगितले. ट्रोजन डिमेलो यांनी जुझे फिलिप यांचे नाव सुचविले व इतरांनी सहमती दर्शविली. येत्या दि. १६ पर्यंत राष्ट्रवादीचे निरीक्षक भारत जाधव हे गोव्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत पुन्हा बैठक घेऊन डिसोझा यांच्याविषयी अंतिम निर्णय होणार आहे. दरम्यान, पक्ष जबाबदारी देत असल्यास आपण काम करण्यास तयार आहोत, अशी भूमिका डिसोझा यांनी घेतली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघचालक मोहन भागवत यांनी मदर तेरेसा यांच्याविषयी केलेल्या विधानाचा जुझे फिलिप यांनी पत्रकारांशी बोलताना निषेध केला. (खास प्रतिनिधी)
जुझे फिलिप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष
By admin | Published: March 05, 2015 1:29 AM