पणजी - केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) भारतीय नागरिकत्व मिळवणारे पाकिस्तानमधील ख्रिस्ती ज्येष्ठ नागरिक जोजेफ फ्रान्सिस परैरा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 'गेली अकरा वर्षे मी भारतीय नागरिकत्वासाठी तिष्ठत होतो, असे सांगितले. ते म्हणाले की,' मला अनेक अडचणी आल्या परंतु त्या सर्व दूर होऊन आता मला भारतीय नागरिकत्व मिळाले आहे ही अत्यंत समाधानाची व आनंदाची गोष्ट आहे.'
हे मनोगत व्यक्त करताना त्यांचा चेहरा खुलला होता. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे मनोमन आभार मानताना 'आता माझे स्वप्न साकार झाले'. असे भावनिक उद् गार काढले. जोझेफ यांचा जन्म गोवा पोर्तुगीज राजवटीत असताना झाला आणि नंतर ते १९६१ मध्ये मुक्तीपूर्वी पाकिस्तानात स्थलांतरित झाले. वयाची सत्तरी ओलांडलेला हा ज्येष्ठ नागरिक आपल्या पत्नीसह सध्या दक्षिण गोव्यात कांसावली येथे राहत आहे. गोव्यातील महिलेशी लग्न झाल्यानंतर ते येथे आले होते . गेली अकरा वर्षे भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी त्यांची खटपट चालली होती.