- दुर्गाश्री सरदेशपांडेआज अर्थव्यवस्था आणि व्यवसायाशी निगडित माहिती देण्यासाठी अनेक वर्तमानपत्रे , न्यूज चॅनल्स आहेत. भारतात बिझनेस जर्नालिझम क्षेत्राचा विकास केव्हा होऊ लागला?- २००५ मध्ये आमची अर्थव्यवस्था वाढत होती. टाटासारखी कंपनी विदेशात जाऊन छोट्या-मोठ्या कंपन्या खरेदी करू लागले होते. विदेशात व्याज दर कमी असल्यामुळे लोक मोठी खरेदी करायचे. त्यामुळे या काळात अर्थव्यवस्थेवर लोकांची नजर जास्त असल्यामुळे बिझनेस जर्नालिझम क्षेत्राचा देखील विकास होऊ लागला. या क्षेत्रात नोकऱ्यांची वाढ होऊ लागली. याच काळात हिंदुस्थान टाइम्सने ‘मिंट’ नावाचे वर्तमानपत्र काढले. त्यानंतर इकॉनॉमिक टाइम्सचे वितरण वाढले. यानंतर अनेक वर्तमानपत्रे आणि न्यूज चॅनल्स येऊ लागले.राजकीय आणि इतर पत्रकार संबंधित व्यक्तीशी चर्चा करून बातम्या लिहितात. मात्र, व्यावसायिक पत्रकारितेमध्ये असे होत नाही. याचा परिणाम बातम्याच्या दर्जावर होतो का?- व्यावसायिक पत्रकारांना एक तर कंपनीचा वार्षिक अहवाल, पीआर किंवा कंपनीच्या विरोधकांकडून माहिती मिळते. तसेच तिसºया व्यक्तीकडूनही माहिती मिळत असते. पत्रकार प्रश्न विचारतो किंवा त्याला पाहिजे म्हणून ही माहिती मिळत नाही. इच्छुक व्यक्तीकडून माहिती मिळत असल्यामुळे पूर्ण माहिती मिळत नाही आणि अनेक गोष्टी लपविल्या जातात. हे होऊ नये म्हणून पत्रकाराने खूप संशोधन करायला पाहिजे नंतर प्रश्न विचारले पाहिजेत. जोपर्यंत आपल्याला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोवर त्यांना प्रश्न विचारत राहिले पाहिजे.तुमच्या पुस्तकात २००८-२०१८ या काळातील आर्थिक परिस्थिती आणि अर्थव्यवस्थेबाबत सांगितले आहे. २००८ पूर्वीचा काळ आर्थिकदृष्ट्या कसा होता?- पूर्वी जीडीपी ८.८ टक्क्यांनी वाढत होती. विदेशात व्याज दर कमी असल्यामुळे भारतात लोक छोटी कंपनी उभारू लागले. याच काळात मोठमोठे पूल आणि रस्ते बांधण्यात आले. त्यासाठी कामगारांची गरज होती. त्यामुळे गावाकडची मंडळी शहरात येऊ लागली आणि कमवू लागली. जगातील अर्थव्यवस्था उत्तमरीत्या चालत असल्याने भारताची अर्थव्यवस्था सुधारत होती. मात्र, २००८नंतर जागतिक अर्थव्यवस्था कोसळली. भारतात २००८ मध्ये घडलेल्या दोन मुख्य घटनांनी सर्व काही बदलले. एक म्हणजे मुंबईमध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील हृदय शस्त्रक्रिया. त्यामुळे प्रणव मुखर्जी अर्थमंत्री झाले आणि इथून भारताची अर्थव्यवस्था बदलू लागली.बदलत्या काळानुसार आणि बदलत्या माध्यमाचा परिणाम अर्थव्यवस्था संबंधित बातम्यांवर झाला आहे का?- पूर्वी प्रिंट मीडिया असल्यामुळे पत्रकारांना संशोधनासाठी वेळ मिळत होता आणि त्यावेळी लिहिणारा पत्रकार देखील अनुभवी असायचा. तेव्हा फक्त अनुभवी पत्रकारांना व्यापार प्रतिनिधी म्हणून घेत होते. २०-२५ वर्षांनंतर या पदावर यायचे. आता ही स्थिती नाही. आता ‘टीआरपी रेट’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’च्या जाळ्यात अडकल्यामुळे पत्रकार खूप संशोधन करत नाहीत. सर्वजण ‘ब्रेकिंग न्यूज’ देण्यासाठी धडपडत असतात. त्यामुळे संशोधनासाठी वेळच मिळत नाही. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नोटबंदीनंतर काही न्यूज चॅनल्सवर दोन हजारांच्या नोटवर ‘चीप’ आहे, अशी बातमी प्रसिद्ध केली होती. सध्या बिझनेस जर्नालिझम नाही तर बिझनेससाठी जर्नालिझम होत आहे. आजपर्यंत अनेक न्यूज वेबसाइट्स आल्या. सध्याची आर्थिक परिस्थिती योग्य नसल्यामुळे आणि बिझनेस मॉडेल स्पष्ट नसल्यामुळे काही वेबसाइट्स बंद पडू लागल्या आहेत. अर्थव्यवस्था ठीक नसली की जाहिरातीवर परिणाम होतो आणि हे सर्व माध्यमे त्यावरच अवलंबून आहेत.