पणजी: चोर्ला मार्गे बेळगावला जाण्यासाठी आता सत्तरीवासियांचा प्रवास ३५ किलो मीटरने कमी झाला आहे. डोंगुर्ली - ठाणे पंचायत क्षेत्रातील जामळीचा तेंब ते राष्ट्रीय महामार्ग दरम्यानच्या तीन किलो मीटर अंतर रस्त्याचे उद्घाटन पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी केले.
या रस्त्यामुळे आता सत्तरीवासियांना बेळगाव येथे जाण्यासाठी चोर्ला घाटात थेट पोहचता येणार आहे. यावेळी डोंगुर्ली - ठाणे पंचायतीच्या सरपंच सरिता गावकर, उपसरपंच तान्या गावकर,पंचायत सदस्य, कंत्राटदार जगदीश राणे, अभियंता तांबोसकर, वेलिंगकर,झिलबा व चंदन उपस्थित होते.
या रस्त्याचे काम प्रलंबित होते. सदर रस्ता हा वन खात्याच्या अधिकारक्षेत्रात येत असल्याने त्यांच्याकडून परवानगी मिळाली नसल्याने त्याचे काम हाती घेणे शक्य नव्हते. मात्र वन खात्याची परवानगी मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली होती. त्यानुसार काम पूर्ण झाल्यानंतर तो वाहतूकीसाठी खुला केला आहे. यामुळे चोर्ला घाटात जाण्यासाठी सत्तरीवासियांना ३५ किलाेमीटर प्रवास कमी करावा लागेल.