लोकमत न्यूज नेटवर्क डिचोली : भारतीय जनता पार्टी मये मतदारसंघातर्फे शिरगाव येथील लईराई देवस्थान परिसरात सफाई अभियान राबविण्यात आले. यावेळी राज्यसभा खासदार सदानंद तानावडे, मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट, भाजप मंडळ अध्यक्ष दयानंद कार्बोटकर, गोवा भाजप महिला अध्यक्ष आरती बांदोडकर, देवस्थानचे पदाधिकारी, सरपंच, सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी खासदार तानावडे यांनी दि. २२ रोजी होणाऱ्या श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यास मोठ्या संख्येने भाविक भक्तगण उत्साही वातावरणात आनंदोत्सव साजरा करणार आहेत. त्याच अनुषंगाने पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतून गावागावातील मंदिरांची सफाई करण्याचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी गोव्यातही अशा प्रकारचे सफाई अभियान राबवण्यात येत आहे, असे सांगितले.
आमदार प्रेमेंद्र शेट यांनी शिरगाव परिसरात देवीच्या परिसरात चरणी साफसफाईचा मान मिळाला, हे भाग्य असून, सर्वानी विकासाच्या प्रक्रियेत पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना सहकार्य करताना सफाई अभियान तसेच स्वयंपूर्ण आत्मनिर्भर गोवा या संकल्पनेला सहकार्य करावे, असे आवाहन केले.
दि. २२ रोजी होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठान कार्यक्रमानिमित्त मये मतदारसंघातील हजारों भाविक भक्तगण सहभागी होणार आहेत, त्याचाच भाग म्हणून आम्ही विविध उपक्रम राबवत आहोत, असे त्यांनी सांगितले. यावेळी सदानंद तानावडे, आमदार प्रेमेंद्र शेट आदींनी मंदिरात परिसरात साफसफाई केली.
प्रत्येक मंदिरात, घरात स्वच्छता राखा : तानावडे
भाजप हा केवळ पक्ष नसून कौटुंबिक जिव्हाळा जपणारा, परिवाराला बरोबर घेऊन सर्व समाजाचे कल्याण व्हावे, हा उद्देश बाळगून कार्यरत राहणारा पक्ष आहे. प्रत्येक घरात, मंदिरात परिसरात स्वच्छता राखणे, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे, याचे भान ठेवून प्रत्येकाने नियमित सफाईसाठी कार्यरत राहावे, तसेच मंदिराचे पवित्र राखावे, असे आवाहन खासदार तानावडे यांनी केले.