लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वोच्च न्यायालयाने दिलेले ३७ हजार खटल्यांवरील निवाड्यांचे हिंदीमध्ये भाषांतर झाले आहे. भविष्यात मराठी व कोकणीबरोबर देशातील अन्य भाषांमध्येही या निवाड्यांचे भाषांतर केले जाईल, असे प्रतिपादन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केले.
गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांच्या 'ट्रेडिशनल ट्रीज ऑफ इंडिया' या पुस्तकाचे दोनापावला येथील राजभवनच्या दरबार हॉलमध्ये सरन्यायाधीशांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व अन्य मान्यवर उपस्थित होते. न्यायालयाने दिलेले निवाडे स्थानिक भाषा जसे मराठी, कोकणी, तमीळ, मल्ल्याळम अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर केले तर लोकांना हे निवाडे समजणे सोपे होते. न्यायालये कशी काम करतात याची माहिती त्यांना मिळेल. यासाठीच स्वातंत्र्यापासून ते आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाने ३७ हजार निवाड्यांचे हिंदी भाषेत भाषांतर केल्याचे त्यांनी सांगितले.
भावी पिढीसाठी निसर्ग, पर्यावरण, झाडे जपणे, त्यांचे संरक्षण करणे ही आमची जबाबदारी आहे. निसर्गाशी माणसाचे नाते अतूट आहे. त्यामुळे त्याचा आदर करावा, जर त्याचा अवमान केला तर वादळ तसेच अन्य नैसर्गिक आपत्तीच्या रूपाने निसर्ग आपल्याला धडा शिकवतो, याची यापूर्वीही काही उदाहरणे दिसून आली आहेत. राज्यपालांनी लिहिलेल्या पुस्तकात झाडांचे मोठे महत्त्व दिले आहे. झाडाला केवळ पर्यावरणातच महत्त्व नसून ते पक्षी, किटकांनादेखील आश्रय तसेच संरक्षणही देते. जीवनचक्रात झाडांचे योगदान मोठे असल्याचे सरन्यायाधीशांनी सांगितले.
निसर्गाचे महत्त्व...
राज्यपाल पिल्लई म्हणाले की, न्यायव्यवस्थेत स्थानिक भाषांचा समावेश असावा. याचा लोकांना मोठा फायदा होणार आहे. लोक सर्वोच्च आहेत. मग जरी राज्यपाल असला तरी तो लोकांशी बांधील असतो. आपले पुस्तक ट्रेडिशनल ट्रीज ऑफ इंडिया हे देशातील विविध प्रकारची झाडे, निसर्गातील त्यांचे महत्त्व, झाडांचा उपयोग यावर अवलंबून असल्याचे त्यांनी नमूद केले.