केंद्र सरकारमुळे देशात न्यायसंस्थाही धोक्यात: अमित पाटकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2023 07:31 AM2023-11-15T07:31:31+5:302023-11-15T07:33:54+5:30
काँग्रेस भवनात पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : "भ्रष्ट जुमला पार्टी'च्या नऊ वर्षांच्या कार्यकाळात न्यायसंस्थाही धोक्यात असल्याचा आरोप कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला. काँग्रेस भवनात पं. जवाहरलाल नेहरु यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले की, पं. नेहरु आधुनिक भारताचे शिल्पकार होते. देशासाठी मजबूत पाया त्यांनी घातला. आज 'भ्रष्ट जुमला पार्टी'च्या कारकिर्दीत न्यायसंस्थाही धोक्यात असून देशात भीतीदायक परिस्थिती आहे. देशाची प्रगती साधण्यासाठी बंधूभाव कसा टिकवून ठेवू शकतो हे आम्ही पहायला हवे.
पाटकर म्हणाले की, 'ज्या काळी देशात सुईदेखील उत्पादित होत नव्हती, त्याकाळी पं. नेहरूंनी मोठ मोठे उद्योग व संस्था भारतात आणल्या. त्यांच्याकडून सर्वांनी स्फूर्ती घेण्याची गरज आहे. त्यांच्या ध्येयनिष्ठ विचारांनीच देशाची प्रगती झाली हे कोणीही विसरू नये. देशाच्या विकासात त्यांचे योगदान मोठे आहे.
आमदार कार्लस फेरेरा म्हणाले की, नेहरूंकडे शिक्षण व अर्थ व्यवस्थेसाठी दूरदृष्टी होती. लोकशाही, सामाजिक उत्कर्ष व सामाजिक न्याय यात त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्या विचारांची आजही देशाला गरज आहे. कार्यक्रमास प्रदेश उपाध्यक्ष एम. के. शेख, शंभूभाऊ बांदेकर, एल्विस गोम्स, अमरनाथ पणजीकर, प्रदीप नाईक, कॅप्टन विरियातो फर्नांडिस, महिला प्रदेशाध्यक्ष बीना नाईक, गुरुदास नाटेकर यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते यावळी उपस्थित होते.