मडगाव: वाहने हाकताना वाहन नियमांचा भंग करणाऱ्यांवर आता स्पेशल ज्युडीशियल मॅजिस्ट्रेट करडी नजर ठेवून आहेत. गोव्यातील आतापर्यंत सासष्टीत स्पेशल ज्युडीशियल मॅजिस्ट्रेटने सप्टेंबर 2018 ते एप्रिल 2019 पर्यंत वाहन नियम भंगाची एकूण 1170 प्रकरणो नोंदविली आहेत. त्यामधून 18 लाख 18 हजार 450 रुपयांचा दंड कायदयाचे पालन न करणाऱ्या वाहनचालकांकडून वसूल केला आहे. दारु पिउन वाहने चालवणे, हॅल्मेट न घालणे व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांचा यात समावेश आहे.
सासष्टीत व्ही. जे. कॉस्ता हे सध्या स्पेशल ज्युडीशियल मॅजिस्ट्रीक आहेत. सप्टेंबर महिन्यात वाहतुक नियमांची एकूण 32 प्रकरणे निकालात काढण्यात आली. यात तालुक्यात 51 हजार 600 रुपये तर मोबाईल वाहनांवरुन वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्यांकडून 14 हजार 100 रुपये दंड घेण्यात आला. त्या महिन्यात एकूण 65 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ऑक्टोबर महिन्यात एकूण 247 प्रकरणे नोंदविली गेली. त्यात मोबाईल वाहनावरील एकूण 9 हजार 450 रुपये तर अन्य ठिकाणी 3 लाख, 86 हजार 150 रुपये दंड ठोठावण्यात आला. एकत्रितरित्या ऑक्टोबर महिन्यात एकूण 3 लाख 95 हजार 600 रुपये दंड वसूल करण्यात आला. नोव्हेंबर महिन्यात वाहतुक नियमांची 180 प्रकरणे नोंद झाली आहेत. तालुक्यात एकूण 2 लाख 45 हजार 50 रुपये तर मोबाईल वाहनावर सात हजार सहाशे रुपये मिळून एकूण 2 लाख 52 हजार 650 रुपये दंड नियमांचे भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून वसूल केला गेला. तर डिसेंबर महिन्यात एकूण 116 वाहतुक नियमभंगांच्या प्रकरणांची नोंद आहे. त्यातून तालुक्यात विविध ठिकाणी कारवाई करुन 1 लाख 46 हजार 600 रुपये तर मोबाईल वाहनावरुन कारवाईत 7 हजार 750 रुपये मिळून एकूण 1 लाख 54 हजार 350 रुपये वसूल करण्यात आले. जानेवारी महिन्यात एकूण 248 प्रकरणांची नोंद आहे. दंडापोटी तीन लाख 74 हजार 100 रुपये सरकारी दरबारी जमा झाले. फेब्रुवारी महिन्यात 137 प्रकरणे घडली. या महिन्यात एकूण 2 लाख 30 हजार 650 रुपये तर मार्च महिन्यात एकूण 138 वाहतूक नियम भंग प्रकरणे घडून 2 लाख 34 हजार 350 तर एप्रिलमध्ये 72 वाहन नियम प्रकरणांची नोंद होउन 1 लाख 11 हजार 50 रुपये दंड आकारला गेला.
मद्यपी वाहन चालकांची संख्या वाढत असून, गोव्यात सहज दारू उपलब्ध असते. तर, दारु पिऊन वाहने चालवली तरी पोलीस कारवाई करीत नाहीत, असा गोड समज करुन काही देशी पर्यटक दारू पिउन वाहने हाकत असतात. कोलवा व तसेच तालुक्यातील अन्य किनारपटटीभागात येणाऱ्या देशी पर्यटक हे आपली स्वताची वाहने घेउन येतात, अनेकजण दारु पिउनच वाहने चालवितात अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली. स्थानिक लोक दारू पिउन वाहने चालविण्यात मागे नाहीत, मद्यपीवर कारवाई झाल्यानंतर त्यांना दंड ठोठावला जातो. दोषींनी दंड न भरल्यास त्यांच्यावर कडक कारवाईही होऊ शकते, कैदेची शिक्षेचीही तरतूद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, मडगाव वाहतुक पोलिसांनीही वाहन नियमाचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचे सत्र सुरू केले होते. दारू पिउन वाहने हाकू नये, तसेच हॅलेम्ट परिधान करावे, असे आवाहनही पोलिसांकडून केले जात आहे.