पणजी : ज्येष्ठ समीक्षक तथा मराठी साहित्यिक प्रा. एस. एस. नाडकर्णी (79) यांचे काल म्हापशातील खाजगी इस्पितळात निधन झाले. धेंपो कला आणि विज्ञान महाविद्यालयात त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून काम केले आहे. तसेच अमरावती येथे विदर्भ महाविद्यालयातही त्यांनी मराठीचे अध्यापन केले आहे. नाडकर्णी यांनी गोमेकॉसाठी देहदान केलेले आहे.
सीताराम सदाशिव नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव होय. त्यांनी अकरा समीक्षात्मक मराठी पुस्तके लिहिली आहेत यात केशवसूत समीक्षा (सहकार्याने), बालकवी समीक्षा, बालकवींची ‘औदुंबर’ कविता : विविध अर्थध्वनी, बालकवी-संदर्भसूची, चाफा कविता आणि विविध समीक्षा, गोमंतकीय मराठी वाङमयाचा इतिहास खंड-2 (सहकार्याने), विश्राम बेडेकर यांच्या ‘रणांगण’ कादंबरीच्या समीक्षेची साठ वर्षे, समग्र बालकवी (सहकार्याने), पिपात मेले ओल्या उंदिर, 29 पद्मगंधा पुणे, बा. भ बोरकर काव्यसमीक्षा (1937 ते 2008) आणि बालकवी-बा. भ. बोरकर - संदर्भसूची या ग्रंथांचा समावेश आहे.
नाडकर्णी यांना त्यांच्या साहित्यिक कामगिरीबद्दल अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. यात अलीकडचा कोकण मराठी परिषदेचा 2017 चा कवी कालिदास साहित्य पुरस्कार, गोमंतक मराठी अकादमीचा कृष्णदास श्यामा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा रा. ना. चव्हाण संदर्भ ग्रंथ पुरस्कारण गोमंतक मराठी अकादमीचा सवोत्कृष्ट साहित्य पुरस्कार, कोकण मराठी परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार, गोवा राज्याचा सांस्कृतिक पुरस्कार आदींचा समावेश आहे. 27 व्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाचे सुवर्णपदकही त्यांना प्राप्त झालेले आहे. अलीकडे त्यांना प्रकृती साथ देत नव्हती तरी त्यांच्यातील लेखक व समीक्षक मात्र अविरतपणे दक्ष व संवेदनशील होता. ऋषीतुल्य संशोधक अ. का. प्रियोळकर यांच्याकडे संशोधन कार्य करण्यासाठी ते गेले होते परंतु तेथे त्यांचा उद्देश फलद्रूप होऊ शकला नाही. गोव्यातील अनेक महाविद्यालयीन तसेच विद्यापीठाच्या मराठीच्या प्राध्यापकांना त्यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. दरम्यान, गोवा विद्यापीठाचे मराठी विभागाचे माजी प्रमुख सु. म. तडकोणकर यानी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करताना प्रेरक व प्रोत्साहक असे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याचे म्हटले आहे. त्यांच्या समीक्षापर लेखनाची सर्वांनाच भविष्यात मदत होईल, असेही तडकोणकर म्हणतात.