वास्को: रविवारी (दि.२४) सकाळी पणजीहून प्रवाशांना घेऊन वास्कोला येणाऱ्या कदंब बसचा चिखली, दाबोळी येथे अपघात घडला. कुठ्ठाळीहून वास्कोच्या दिशेने येणाऱ्या कदंब बस चालकाचा डाऊन चिखली, दाबोळी येथील वळणावर ‘स्टिअरींग’ वरील ताबा सुटल्याने त्यांने तेथून अंतर्गत रस्त्यावर वळण घेणाऱ्या एका चारचाकीला आणि नंतर तेथील एका कुंपणाला जबर धडक दिली. देवाच्या कृपेने त्या अपघातातून कदंब बसमधील प्रवासी - चालक आणि अपघातावेळी परिसरात असलेले लोक सुखरुप बचावल्याने ‘बाप्पा’ च्या कृपेनेच सर्वजण सुखरुप बचावले असे म्हणावे लागेल.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार रविवारी सकाळी ९.३० वाजता तो अपघात घडला. पणजीहून प्रवाशांना घेऊन येणारी कदंब बस जेव्हा डाऊन चिखली येथील वळणावर पोचली त्यावेळी पुढच्या दिशेने चुकीच्या बाजूने पोचलेल्या एका वाहनामुळे आणि तेथे बाजूला पार्क केलेल्या एका चारचाकीमुळे कदंब बस चालकाचा ‘स्टिअरींग’ वरील ताबा सुटला. चुकीच्या दिशेने (वळणावर) पोचलेल्या चारचाकी वाहनाला वाचवण्याचा प्रयत्न करताना कदंब बस चालकाचा ‘स्टिअरींग’ वरील ताबा सुटल्याची माहीती अपघातस्थळी उपस्थित काही लोकांकडून मिळाली.
‘स्टिअरींग’ वरील ताबा सुटल्यानंतर त्या कदंब बसने तेथे अंतर्गत रस्त्यावर वळण घेणाऱ्या एका चारचाकीला आणि नंतर तेथील एका कुंपणाला जाऊन जबर धकड दिली. अपघात घडल्याचे तेथे उपस्थित असलेल्या लोकांना दिसून येताच त्यांनी त्वरित अपघातात सापडलेल्या लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली. अपघातस्थळी पोचल्यानंतर त्या अपघातातून सर्वजण सुखरुप बचावल्याचे लोकांनी पाहताच त्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
वास्को पोलीसांना अपघाताची माहीती मिळताच त्यांनी त्वरित घटनास्थळावर धाव घेऊन अपघातातून सर्वजण सुखरुप बचावल्याची खात्री करून घेतली. तसेच वास्को पोलीस स्थानकाचे हवालदार आशिष नाईक यांनी त्या अपघाताचा पंचनामा करून अपघाताचे ते प्रकरण नोंद केले आहे. सद्या सर्वत्र गणेश चतुर्थीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करण्यात येत असून रविवारी घडलेल्या त्या अपघातातून कदंब बसमध्ये असलेले प्रवासी - चालक आणि इत्यादी लोक सुखरुप बचावल्याने सर्वांना ‘बाप्पा’ पोचले असेच म्हणावे लागेल.