पणजी : कदंब महामंडळ उद्या मंगळवार पासून महाराष्ट्रातील काही निवडक मार्गांवर बससेवा सुरू करत आहे. वेंगुर्ले, मालवण सावंतवाडी आणि कोरजाई या मार्गांवर या बसगाड्या उद्यापासून धावणार आहेत. कदंब महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, प्रारंभी आम्ही प्रत्येकी दोन-दोन फेऱ्याच सुरू करीत आहोत.
तब्बल सहा महिन्यांच्या कालखंडानंतर शेजारी महाराष्ट्रात कदंबच्या गाड्या जाऊ लागणार आहेत. शेजारी सिंधुदुर्गातील अनेक तरुण गोव्यात नोकरीसाठी येत असतात. १ सप्टेंबरपासून सीमा खुल्या झाल्या तरी त्यांना ये जा करणे अशक्य बनले होते. सार्वजनिक बस वाहतूक आता सुरू होत असल्याने या नोकरदारांना दिलासा मिळाला आहे.
घाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार वास्को- वेंगुर्ले बस सकाळी ६ वाजता वास्कोहून सुटेल. पणजीहून सकाळी ७.१५ वाजता ही बस वेंगुर्लेकडे निघेल. वेंगुर्ल्याहुन परतीच्या प्रवासासाठी सकाळी १०.०५ मिनिटांनी ही बस सुटेल.
पणजीहून वेंगुर्लेला जाण्यासाठी दुपारी १.०५ वाजता बस सुटेल. हीच बस वेंगुर्ल्याहुन परतीच्या प्रवासासाठी दुपारी ४ वाजता निघेल.
वास्को -वेंगुर्ले- कोरजाई बस सकाळी ७ वाजता वास्कोहून सुटेल. पणजीहून सकाळी ८.१० मिनिटांनी ही बस वेंगुर्लेकडे निघेल. परतीच्या प्रवासासाठी कोरजाईहून सकाळी ११.४५ वाजता ही बस निघेल आणि वेंगुर्लेमार्गे येईल.
मडगाव- मालवण बस सकाळी ७.४५ वाजता मडगावहून सुटेल. परतीच्या प्रवासासाठी ही बस दुपारी २.३० वाजता मालवणहून निघेल.
पणजीहून घोडगेवाडी बस सायंकाळी ५.४० वाजता सुटेल. ही बस वस्तीला राहील आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजता घोडगेवाडीहून पणजीला येण्यासाठी निघेल.
पणजी- पत्रादेवी- सावंतवाडी बस सायंकाळी ५.४५ वाजता आणि सायंकाळी ६.३० वाजता सावंतवाडीला जाण्यासाठी निघतील. या दोन्ही बसेस वस्तीला राहणार असून एक बस दुसऱ्या दिवशी सकाळी ६.४५ वाजता तर दुसरी बस सकाळी ७.१५ वाजता पणजीला येण्यासाठी निघेल.
कारवार, बेळगावलाही बसेसपणजीहून कारवारला जाण्यासाठी सायंकाळी ५.१५ वाजता बस निघेल. ही बस कारवारहून परतीच्या प्रवासासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी ५.३० वाजता निघेल.
घाटे म्हणाले की, गोवा - कारवार मार्गावर सध्या ५ बसेस धावत आहेत तसेच मडगाव- बेळगाव, पणजी- बेळगांव ४ बसगाड्या सुरू झालेल्या आहेत. कालांतराने या फेऱ्या वाढविण्यात येतील.