पणजी (नारायण गावस) : कदंब कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन सातव्या दिवशीही आझाद मैदानावर सुरुच आहे. या कामगारांच्या आंदोलनाची दखल कंदब महामंडळाने तसेच सरकारने घेतली नाही. त्यामुळे उद्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. तसेच गुरुवारपासून पणजी बसस्थानकावर आंदोलन केले जाणार असल्याचे कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत चोडणकर यांनी सांगितले.
आपल्या विविध मागण्यांसाठी कदंब परिवहन महामंडळ चालक व सहयोगी कर्मचारी संघाच्यावतीने गेल्या बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. आज ७ दिवस झाले आहेत. रविवार वगळता हे कर्मचारी राेज सकाळी ९.३० ते दुपारी १ पर्यंत आपल्या विविध मागण्यांसाठी आझाद मैदानावर बसले आहेत. कदंब बसेस बंद न ठेवता मिळेल त्या वेळेत हे कर्मचारी या आंदोलनात सहभागी होत आहेत.
सातवा वेतन लागू करणे, पीएफ वाढवून देण तसेच नवीन बसेस घेऊन त्या कदंब कर्मचाऱ्यांना चालवायला देणे. राहीलेली अनेक महिन्यांची थकबाकी देणे अशा विविध मागण्या या कर्मचाऱ्यांच्या आहेत. नुकतेच अधिवेशन आणि बजेटही झाला पण या कामगारांची काहीच चर्चा केलेली नाही. आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय कदंब कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना आयटक नेते ॲड. ख्रिस्तोफर फोन्सेका ॲड. राजू मंगेशकर, ॲड. सुहास नाईक या कामगार नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. तसेच राज्यातील ४५ संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
आंदोलनाकडे महामंडळ, सरकारने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ते लवकरच आंदोलनाची जागा पणजी बसस्थानकावर बदलण्याची शक्यता आहे. आंदोलनाचे ठिकाण बदलणे आणि आंदोलनाची व्याप्ती वाढविण्याबाबत चर्चा करण्यासाठी संघटना पदाधिकाऱ्यांची तातडीची उद्या बैठकही होणार आहे.