पणजी : कदंब महामंडळाच्या कंत्राटी महिला कामगाराला कामावरून कमी करण्यात आल्याने शनिवारी सहकारी कामगारांनी पणजी बसस्थानकावर धरणे आंदोलन केले. क्षुल्लक कारणावरून कामगारांना कमी करण्यात आले असून त्यांना पुन्हा सेवेत घेतले जावे, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा सोमवारपासून पुन्हा धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कामगार संघटनेचे पदाधिकारी गजानन नाईक यांनी दिला. कदंब महामंडळाच्या कंत्राटी कामगार भारती मांद्रेकर या गेल्या साडेपाच वर्षांपासून महामंडळात झाडू मारण्याचे काम करत आहेत. काही दिवसांपूर्वी कदंबच्या पर्वरी डेपो येथे वडाचे झाड कापण्यात आले होते. त्या झाडाच्या डहाळ्या उचलून ते साफ करण्याचे काम भारती यांना सांगण्यात आले. महिला कर्मचारी असल्याने त्यांना वडाच्या डहाळ्या उचलणे शक्य नव्हते. आपल्या एकट्याकडून ते काम होणार नसून त्यासाठी मदत घ्यावी लागेल, असे त्यांनी सांगितले. मात्र, त्यांनी कामास नकार दिला, असे कारण देत त्यांना कामावरून कमी करण्यात आले. भारती मांद्रेकर यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे. महामंडळात गेल्या पाच ते वीस वर्षांपर्यंत कंत्राटी पद्धतीने काम करणारे अनेक कामगार आहेत. या कामगारांना दिवसाला २१५ रुपयांप्रमाणे वेतन देण्यात येते. त्यात वाढ करून ते ४00 ते ४५0 रुपये करण्यात यावे, अशी मागणीही कामगारांनी केली आहे. सुमारे शंभर कामगारांनी शनिवारी सकाळपासून सायंकाळपर्यंत कदंब बसस्थानकावर धरणे आंदोलन केले. (प्रतिनिधी)
कदंब कर्मचाऱ्यांचे धरणे
By admin | Published: August 23, 2015 2:05 AM