पणजी : २०२० चे राष्ट्रीय चित्रपट महोत्सव पारितोषिक सोमवारी, २२ रोजी जाहीर झाले. प्रादेशिक कोकणी भाषेसाठी ‘काजरो’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. समाजातील वेगवेगळ्या व्यवस्थेमधल्या, सामाजिक जाणीवांचं दर्शन ‘काजरो’ या चित्रपटात घडते. अस्पृश्य जातीच्या तिळग्यामार्फत समाजात प्रचलित जात आणि वर्गभेद यावर हा चित्रपट कठोर भाष्य करतो.
२०१९ मध्ये मामी फिल्म फेस्टिव्हल (मुंबई), बंगलोर आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२०, २०१९ मध्ये इफ्फी, गोवा आणि औरंगाबाद चित्रपट महोत्सव २०२० यात ‘काजरो’ची निवड झाली होती. औरंगाबाद चित्रपट महोत्सवात या चित्रपटाचा नायक विठ्ठल काळे याला तिळग्याच्या भूमिकेसाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटाचे निर्माते राजेश पेडणेकर (डी गोवन स्टुडिओ, गोवा), कार्यकारी निर्माते प्रवीण वानखेडे, दिग्दर्शक नितीन भास्कर, लेखक प्रकाश परीयनकर, पटकथा आणि संवाद भूषण पाटील, छायांकन - समीर भास्कर, पोस्ट - स्मिता फडके, संगीत - रोहित नागभिडे , साऊंड - धनंजय साठे, कला - नितीन बोरकर, लाईन प्रोड्युसर - नितीन कुलकर्णी, कलाकार - विठ्ठल काळे, ज्योती बागकार -पांचाळ, पांडुरंग पांगम, अभय जोग हे आहेत.
सामाजिक वर्गीकरण प्रणालीने मला नेहमीच अस्वस्थ केले आहे, म्हणून मी जेव्हा ‘काजरो’ची गोष्ट ऐकली तेव्हा मला वाटलं की समाजात जे वर्गीकरण आहे त्याबद्दल मला जे वाटते तेच मांडणे योग्य. स्क्रीनवर एक शॉर्टफिल्मच्या माध्यमातून दोन तासांत कोणाच्याही जीवनाच्या घडामोडी दाखविणे हे माझ्यासाठी खूप आव्हानात्मक आहे, म्हणून मी अधिक संवेदनशील घटना, मानवी संबंध, त्यांचे स्थान आणि वेळ संवेदनशील भावनांनी व्यक्त करण्यास सक्षम होतो. - नितीन भास्कर, चित्रपटाचे दिग्दर्शक