किशोर कुबल
पणजी : सांतइनेज येथील काकुलो मॉल ते मधुबन जंक्शन व पुढे टी. बी. इस्पितळाकडे जाणाऱ्या कॉंक्रिटच्या रस्त्याचे काम पूर्ण होऊन आज मंगळवारी हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यात आला.
इमेजिन स्मार्ट सिटी डेव्हलॉपमेंट लि,चे सीईओ संजित रॉड्रिग्स यांनी ही माहिती दिली आहे. नेहमी वर्दळीचा असलेला हा मार्ग रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणामुळे गेला काही काळ बंद होता. त्यामुळे या भागात वाहतुकीची कोंडी होत असे. आता ही कोंडी दूर होणार असून वाहतूक सुरळीत होणार असल्याचे ते म्हणाले. संजित यांनी अधिक माहिती देताना असे सांगितले की, ‘ दहा दिवसांपूर्वी या रस्त्याचे कॉक्रिटीकरण पूर्ण झाले होते. क्युअरिंगसाठी तो खुला करण्यात आला नव्हता. उद्या किंवा परवा मधुबन जंक्शन ते कामत प्लाझापर्यंतचा रस्ताही खुला केला जाईल. त्यामुळे कामत आर्केड, कामत प्लाझा, झरीना टॉवर्स तसेच स्मशानभूमी भागातील वाहतुकही सुरळीत होईल. संजित म्हणाले कि, मलनि:सारण वाहिन्या टाकण्याचे काम गतीने पूर्ण केले जात आहे. स्मार्ट सिटीची सर्व कामे ३१ मे पूर्वी पूर्ण करण्याची डेडलाइन निश्चितच पूर्ण होईल.’