पणजी : मागील दोन वर्षापासून खुली होण्याकरिता बहुप्रतिक्षेत असलेली कला अकादमी येत्या दि १० रोजी जनतेसाठी, कलाप्रेमीसाठी खुली होणार आहे, अशी माहिती कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी दिली.
सोमवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी दिली. यावेळी कला व संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप, सदस्य सचिव विनेश आर्लेकर उपस्थित होते.
मुख्यमंत्री डाॅ प्रमोद सावंत यांच्याहस्ते नूतन कला अकादमीचे उद्घाटन स. १०वा. होणार आहे. त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, महसूल मंत्री व पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात, पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात, मुख्य सचिव पुनीत गोयल, कला व संस्कृती सचिव मिनिनो डिसोझा आयएएस, उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर हा सोहळा झाल्यानंतर सायं. ७ वा सिद्धीनंदन थिएटर नागेशी फोंडा प्रस्तुत प्रा. वसंत कानेटकर लिखित ऐतिहासिक नाटक इथे ओशाळला मृत्यु नाटक सादर होणार आहे, असे गावडे यांनी यावेळी सांगितले.
इफ्फीसाठी कला अकादमी सज्ज मागील तीन वर्षे कला अकादमीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते, ते आता जवळपास पूर्णत्वाला आले आहे. कला अकादमीचा स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल हाती आला तेव्हापासून कला अकादमीचे काम जलदगतीने सुरू केले. कला अकादमीचे उद्घाटन झाल्यानंतर दि. २० रोजीपासून गोव्यात होणाऱ्या इफ्फीसाठी कला अकादमी वापरण्यात येईल, असे गावडे यांनी सांगितले. उच्च दर्जाच्या सुविधा कला अकादमीचा मुख्य सभागृह, ब्लॅक बॉक्स, आर्ट गॅलरी, ज्युरी रूम, मीटींग रूम, भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचे वर्गा सारखी साधनसुविधा विकसित करण्यात आल्या आहेत. सभागृहातील साऊंड व्यवस्था, स्टेज काफ्ट लाईट्स, एसी यंत्रणा ही नवीन बसविण्यात आली आहेत. भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीताचे वर्ग जे यांची क्षमता वाढविण्यात आली आहेत. फोंडा येथील राजीव गांधी कलामंदिरात घेण्यात येत असलेल्या थिएटर कॉलेज ऑफ पर्फमिन्स दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचा विचार केला जात आहे. परंतु नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईपर्यंत थिएटर कॉलेज राजीव गांधी कलामंदिरात सुरू राहील. त्यानंतर हळुहळु वर्षभराचे कला अकादमीचे कार्यक्रम सुरू होतील. अशी माहिती मंत्री गावडे यांनी दिली.
ओपन ओडिटोरियमच्या कामाला वेळ लागणार कला अकादमीचे ओपन ओडिटोरियमचे छत हल्लीच कोसळले होते, पावसामुळे हे काम करण्यात व्यत्यय येत आहे, त्यामुळे ओपन ओडिटोरियमचे काम अजूनपर्यंत सुरू करण्यात आले नाही. हे काम पूर्ण होण्यासाठी आणखी काही वेळ लागू शकतो, असेही गावडे यांनी सांगितले.