लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : संगीत, नृत्य, नाट्य, साहित्य तसेच इतर कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या ४१ ते ५९ वर्षे वयोगटातील कलाकारांना या वर्षापासून 'कलावृद्धी' पुरस्काराने गौरविले जाणार आहे. दरवर्षी दहा कलाकार या पुरस्कारासाठी निवडले जातील.
कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, दरवर्षी दहा कलाकारांना हा पुरस्कार दिला जाईल. २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असेल. कला क्षेत्रात वावरणाऱ्या विविध संस्थांनी या पुरस्कारासाठी आपल्या अवतीभोवती वावरणाऱ्या कलाकारांच्या नावाची शिफारस करता येईल. तसेच सरकार स्वेच्छा दखल घेऊनही या पुरस्कारासाठी कलाकार निवडणार आहे. येत्या सोमवारपासून अर्ज उपलब्ध होतील. अर्ज सादर करण्यासाठी पुढील महिनाभराची मुदत आहे. कला संस्कृती खात्यात तसेच सर्व रवींद्र भवने, राजीव गांधी कला मंदिर येथे अर्ज उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे ऑनलाईनही अर्ज करता येतील.
याआधी युवा सृजन पुरस्कार मिळालेला असेल तर त्यांना कलावृद्धी पुरस्कारासाठी अर्ज करता येणार नाही. तसेच हा पुरस्कार मरणोत्तर दिला जाणार नाही. एखाद्या कलाकाराने अर्ज केलेला असेल व छाननी समितीने संबंधित कलाकाराची पुरस्कारासाठी निवड केलेली असेल व कालांतराने त्याचे निधन झाले असेल तरच मरणोत्तर पुरस्कार दिला जाईल अन्यथा नाही, असे गावडे यांनी स्पष्ट केले.
मंत्री म्हणाले की ४१ ते ५९ त्या वयोगटातील वर्गवारीत कलाकारांसाठी एकाही पुरस्काराची व्यवस्था अजूनपर्यंत झालेली नव्हती. युवा सृजन पुरस्कार ४० वर्षे वयापर्यंत दिला जातो. या शिवाय सांस्कृतिक पुरस्कार, कला गौरव उत्कृष्ट वाचनालय व इतर पुरस्कार आहेत. परंतु वरील वयोगटात कोणताही पुरस्कार नव्हता. त्यामुळे कलाकारांची वाढती मागणी होती व याच अनुषंगाने हा पुरस्कार आता दरवर्षी देण्याचे सरकारने ठरवले आहे.
'लिटल स्टार्स ऑफ गोवा' संकल्पना राबवू
इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमधील कलागुण शोधून काढण्यासाठी 'टॅलेंट सर्च' स्पर्धा होईल, त्याच्या तारखा नंतर जाहीर करू, वरील इयत्तांमधील शालेय विद्यार्थ्यांना यामुळे नृत्य, संगीत तसेच इतर कलाक्षेत्रातील अदाकारी पेश करण्यासाठी व्यासपीठ मिळेल. 'लिटल स्टार्स ऑफ गोवा' ही संकल्पना राबवली जाईल. पालक, शिक्षक, विद्यार्थ्यांनी यासाठी सहकार्य द्यावे. ठीकठिकाणी कला संस्कृती खात्यातर्फे शाळांमध्ये नेमलेले संगीत शिक्षकही कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखण्यासाठी मदत करतील. कलावृद्धी पुरस्कार येत्या लोकोत्सवात देण्यात येतील, असेही मंत्री गावडे म्हणाले.