पणजी : सर्वात मोठा पक्ष ठरूनही सत्ता स्थापन न करू शकलेल्या काँग्रेसमध्ये आता आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा सुरूच आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाची भाजपबरोबर निवडणूकपूर्व छुपी युती होती, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी शुक्रवारी केला. काँग्रेसचे सरकार न येण्यास पक्ष प्रभारी दिग्विजय सिंग यांना लुईझिन यांनी जबाबदार धरले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे गोवा प्रभारी असलेल्या दिग्विजय सिंग यांनी गोव्यातील एकूण फियास्कोला स्थानिक नेत्यांनाच जबाबदार धरले आहे. त्यांचा रोख अर्थातच लुईझिन यांच्याकडे जातो.सत्ता स्थापनेसाठी राज्यपालांना काँग्रेसला बोलवावे, अशी विनंती करणारे पत्र ११ मार्च रोजी निकालानंतर रात्रीच तयार होते; परंतु पक्ष प्रभारी दिग्विजय सिंग यांनी राज्यपालांच्या निमंत्रणाची वाट पाहू, असे सूचित केल्याने आम्ही ते दिले नाही, असे लुईझिन यांनी सांगितले. काँग्रेसने विलंब केला किंवा सुस्त राहिल्याची टीका त्यांनी फेटाळली. लुईझिन यांनी हल्लाबोल करताना आमदार मायकल लोबो यांनी साळगाव तसेच शिवोली मतदारसंघात गोवा फॉरवर्डचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कामही केले आणि पैसाही ओतल्याचा आरोप केला. राज्यपालांना पत्र देण्यापासून रोखणारी दिग्विजय सिंग यांची कृती महागात पडली काय, असा सवाल केला असता ‘मी कोणाला दोष का म्हणून द्यावा,’ असे त्यांनी विचारले़दरम्यान, गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर काँग्रेसच्या निवडणूकपूर्व युतीचा प्रस्ताव पक्षातील काही स्थानिक नेत्यांनीच फलद्रूप होऊ दिला नाही, असा आरोप काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी ट्विटरवर केला. (प्रतिनिधी)
काँग्रेसमध्ये कलगीतुरा
By admin | Published: March 18, 2017 2:50 AM