पणजी : लुईस बर्जर-जैका लाच प्रकरणी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी सार्वजनिक बांधकाममंत्री चर्चिल आलेमाव या दोघांना मिळून एकूण आठ हप्त्यांत लाच दिल्याचे तपासात स्पष्ट झालेले आहे. विशेष सूत्रांनी ही माहिती दिली. कामत यांना २००९-१० या काळात दोन वेळा, तर २०१०-११ या काळात दोनदा लाच दिली. चर्चिल यांना २००९-१० या काळात दोन वेळा आणि २०१०-११ या काळात दोनवेळा लाच दिली होती, असेही अटकेतील संशयितांच्या जबाबातून स्पष्ट होते. हवाला एजंट रायचंद सोनी याने लाचेची रक्कम आणून त्याचा कर्मचारी मुकेश भारती याला दिली. मुकेशने ती लुईस बर्जर कंपनीचे तत्कालीन अधिकारी शिवराम प्रसाद व संजय जिंदाल यांना दिली. या दोघांनी ती कामत आणि चर्चिल आलेमाव यांना दिली, असे तपासात उघड झाले आहे. मुकेश आणि सोनी यांनी तसा कबुली जबाब दिला आहे. रायचंद सोनीला अटक केल्यानंतर या लाच प्रकरणाचा तपास निर्णायक टप्प्यावर आला आहे. लाचेची रक्कम कोठून आली, कोणाकडून पैसे कोणाला पोहोचविले याचा दिल्ली ते गल्लीपर्यंतचा प्रवास स्पष्ट झाला आहे. क्राईम ब्रँचच्या हाती लागलेला सोनी हा या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा आहे. त्यानेच पैसे दिल्लीहून गोव्यात ट्रान्सफर करून घेतले. त्यानंतर त्याच्या मुकेश भारती नामक कर्मचाऱ्याने ते प्रसाद व जिंदाल यांना दिले. त्यांनी ते नंतर चर्चिल व कामत यांना दिले. या दोघांनीही फौजदारी गुन्हा प्रक्रिया संहिता कलम १६४ अंतर्गत पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायाधीशांसमोर तसा जबाब नोंदविलेला आहे. विशेष सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली. सोनी आणि मुकेश यांचे जवाब सात आॅगस्ट रोजी नोंदविले होते. २५ जुलै रोजी प्रसाद व जिंदाल यांचे जबाब नोंदविले होते. या सर्व जबाबात एकसूत्रता असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय जैकाचे माजी प्रकल्प संचालक आनंद वाचासुंदर यांचा जबाबही या एकसूत्रतेला पुष्टी देणारा आहे. त्यामुळे हे प्रकरण वैधानिकदृष्ट्या मजबूत बनल्याचा क्राईम ब्र्रँचचा दावा आहे. या पार्श्वभूमीवर आता सोमवारी (१० आॅगस्ट) चर्चिलच्या जामिनावर, तर बुधवारी (१२ आॅगस्ट) कामत यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी होईल. परिणामी तीत काय होईल, याबाबत उत्सुकता वाढली आहे. (प्रतिनिधी)
कामत, चर्चिलला आठ वेळा लाच
By admin | Published: August 09, 2015 12:58 AM