नरेश डोंगरे / आशिष रॉय
पणजी (गोवा) : कॅसिनो बेकायदेशीर आहे आणि कॅसिनोमुळे तरुणाई उद्ध्वस्त होत असल्याचे लक्षात आल्यामुळे कंदोली (कंडोलिम) या छोट्याशा गावातील गावकऱ्यांनी आपला बाणेदारपणा दाखवला. त्यांनी जोरदार विरोध करून कॅसिनोचा वाणिज्य परवाना नाकारला. एवढेच नव्हे तर या गावात लावलेले कॅसिनोचे डिस्प्ले बोर्डही उखडून फेकले.
पणजीजवळ कंदोली हे छोटेसे सुंदर गाव आहे. येथील समुद्रकिनारा पर्यटकांना आकर्षित करणारा. हे गाव कमालीचे स्वाभिमानी. या ग्रामपंचायतीकडे ग्रँड- ७ कॅसिनोने व्यापारासाठी परवानगी मागितली होती. मात्र, येथे कॅसिनो सुरू झाल्यास गावातील तसेच आजूबाजूचे तरुण उद्ध्वस्त होतील, हा धोका लक्षात घेऊन कॅसिनोला गावकऱ्यांनी तीव्र विरोध केला. परवानगीही नाकारली. सरपंच अनासितो फर्नांडिस यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पुढच्या पिढीचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही स्थितीत कॅसिनोला परवानगी देणार नाही.
झुकेगा नहीं साला...आमच्या गावात कॅसिनोने ५८ डिस्प्ले बोर्ड लावले होते. आम्ही ते काढून टाकले. कॅसिनो व्यवस्थापनापुढे किंवा कोणत्याही दबावापुढे ‘झुकेगा नहीं साला...’ असेही फर्नांडिस यानी ठणकावून सांगितले.
सरकारला आपल्याच लोकांची काळजी नाही कॅसिनो सुरू झाल्यापासून जुगाराचे व्यसन जडलेल्यांची वाढती संख्या आणि त्याचे दुष्परिणाम लक्षात घेता गृह विभागाने कॅसिनोत स्थानिकांना प्रवेश देऊ नये, असा प्रस्ताव पाठवला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, असा आरोप गोवेकर करतात. आपल्याच राज्यातील नागरिकांची सरकारला काळजी नाही, असाही उद्वेग ही मंडळी व्यक्त करतात.
अनेक जण झाले बरबाद म्हणून...बहुताश राज्यांनी कॅसिनोला परवानी दिलेली नाही. कॅसिनोमुळे अनेकजण बरबाद झाले आहेत. त्यामुळे कॅसिनोवर संपूर्ण देशात बंदी घालायला हवी, असे परखड मत फर्नांडिस यांनी व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्त्या मेरी डिकोस्टा म्हणाल्या, तरुणांनी कॅसिनोच्या नादी लागून संपत्ती गमावली. यामुळे स्त्रियांची कोंडी झाली. ही स्थिती कुणाला सांगूही शकत नाही. गोव्यात अशी अनेक कुटुंब असल्याचे त्या म्हणाल्या.