नारायण गावस
पणजी : यंदाचा काणकोणमधील २३ वा लोकोत्सव ८ ते १० डिसेंबर या कालावधीत आदर्श ग्राम, काणकोण येथे होणार असल्याची माहिती सभापती रमेश तवडकर यांनी मंगळवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आदर्श ग्रामला सांस्कृतिक हब तसेच कायमस्वरुपी लोकोस्तवाचे ठिकाण करणार असेही सभापती तवडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासमवेत काणकोणमधील आदर्श युवक संघाचे सचिव अशोक गावकर, संतोष लोलयेकर, धीरज कोरगावकर उपस्थित होते.
ग्राम संस्कृतीचे दर्शन
राज्याच्या कानाकोपऱ्यातील लोकनृत्ये आणि लोकगीते या उत्सवात सादर केली जाणार आहेत. तसेच पारंपरिक वनौषधींचे महत्त्व आणि गोमंतकीय खाद्य संस्कृतीचे महत्त्व लोकांना कळावे यासाठी या लोकोस्तवात स्टॉल्सचेही आयोजन करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सेंद्रीय शेतीतून घेण्यात येणाऱ्या उत्पादनांना मार्केट मिळवून देण्यासाठी त्यांचेही स्टॉल्स लावण्यात येणार आहेत यात तीन दिवसांत विविध सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून गोव्याच्या ग्राम आणि लोकसंस्कृतीचे दर्शन या लोकोतस्वात होणार आहे.
गेली २२ वर्षे यशस्वी आयोजन
आदर्श युवक संघ आणि बलराम शिक्षण सोसायटीमार्फत गेल्या २२ वर्षांपासून काणकोणमध्ये लोकोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच पद्धतीने यंदाचा २३ वा लोकोस्तव ८ ते १० डिसेंबर या कालावधीत हाेणार आहे. या लोकोत्सवाचे उद्घाटन ८ रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. यंदाचे खास आकर्षण म्हणजे लोकोत्सवात सहा राज्यांच्या सभापतींना आमंत्रित करण्यात आलेले आहे. यात उत्तर प्रदेश, हरयाणा, उत्तराखंड, गुजरात, आसाम आणि महाराष्ट्राच्या सभापतींचा समावेश आहे, सभापती तवडकर यांनी सांगितले.
बारा राज्यांतील कलाकर सादर करणार कला
यंदाही या लोकाेत्सवात बारा राज्यांतील कलाकारांना निमंत्रित करण्यात आले आहे. यामुळे गोमंतकीयांना इतर राज्यांतील कलांचाही आस्वाद घेता येणार आहे. या लोकोतस्वात विविध क्षेत्रात नाव कमावलेल्या सहा संस्था आणि सात व्यक्तींचाही गौरव करण्यात येणार असल्याची माहिती सभापती तवडकरांनी दिली.