पणजी: करंझाळे किनाऱ्यावर मासेमारी करताना पर्यटन खाते आणि मत्सव्यावसाय खाते आम्हाला खुप त्रास करत आहेत. करंझाळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात जलक्रीडा आयोजित करण्यात येत असून, यातून मास्यांची आवाक कमी झाली आहे. आता तर सदर संपूर्ण किनारा जलक्रीडा उपक्रमांसाठी राखीव ठेवण्याबाबत चर्चा आहे. पण आम्ही असे होऊ देणार नाही. उलट करंझाळे किनारा मासेमारीसाठीच सरकारने राखीव ठेवावा, अशी मागणी करंझाळे रापोनकार एकवोट संघटनेचे अध्यक्ष फ्रांसिस्को वाझ यांनी केली.
करंझाळे येथे गुरुवारी करंझाळे रापोनकार एकवोट संघटनेतर्फे पत्रकार परीषद घेत आपला विषय मांडला. यावेळी संघटनेचे अध्यक्ष फ्रांसिस्को वाझ यांच्यासोबत अँथनी वाझ, लिंडा परेरा , व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या १०० वर्षापासून आम्ही करंझाळे किनाऱ्यावर मासेमारी करत आहोत. आमच्या पूर्वजांचे जीवन यात गेले. मासेमारी करतच आम्ही आमच्या कुटूंबाचे पालनपोशन करत असतो, एवढेच नाही तर अनेक कामगारही यावरच अवलंबून आहेेत. पण आता असे वाटते की सरकार मुद्दामहून आमची सतावणूक करत आहे. मात्र आता आम्ही शांत बसणार नसून, आम्हाला कुठल्याही प्रकारचे जलक्रीडा उपक्रम करंझाळे किनारी भागात दिसले तर ते आम्ही चालू देणार नाही. आवश्यक पडल्यास नदीचे चॅनल्स देखील आम्ही बंद ठेऊ, असा कडक इशारा फ्रांसिस्को वाझ यांनी यावेळी दिला.
करंझाळे येथे खऱ्या अर्थाने समुद्र जीवन राहीले आहे. येथे विविध प्रकारचे मासे, खेकडे, कालवा, शिणाने मिळत आहेत. पण जलक्रीडांमुळे यावर परीणाम होऊ शकतो. यापूर्वी दोनापावला येथे मोठ्या प्रमाणात मासे मिळायचे, पण तेथे जलक्रीडा आणल्यामुळे तेथे आता जास्त मासे मिळत नाही, असेच काहीसे करंझाळे किनाऱ्याबाबत होणार आहे. आम्ही याबाबत विविध खात्यांना देखील पत्र लिहले आहे. पण तरीही पोलिसांची धमकी आम्हाला मिळत आहे. आता याबाबत पणजीच्या आमदारांची आम्ही भेट घेणार असून, त्यांच्यापर्यंत आम्ही हा विषय पोहचविणार आहोत, असेही वाझ यांनी पुढे सांगितले.