पणजी - करीन शिरोडकरने रविवारी ३७ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये पेंचाक सिलाट क्रिडा प्रकारात गोव्याला दुसरे सुवर्णपदक मिळवून दिले. टँडिंग महिला ८०-८५ किलो गटात जम्मू-काश्मीरच्या जिया चौधरीवर ३०-१५ असे वर्चस्व राखून करीनाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. कांपाल येथील क्रीडा ग्राम येथे ही स्पर्धा सुरू आहे.
पहिल्या फेरीपासूनच करीनाने चांगली खेळी केली. पहिल्या फेरीत ११-८ अशी आघाडी घेतली आणि मागे वळून पाहिले नाही, शेवटी ३०-१५ असे वर्चस्व राखत वीजय मिळविला. मॉडर्न पँटेथलॉनमध्ये लेझर रनमध्ये बाबु गावकर याने पहिले सुवर्ण पदक प्राप्त करुन दिले होते, यानंतर करीनाने सुवर्ण पदक प्राप्त करण्याची कामगीरी केली आहे. करीनाने याआधी टायक्वांदोमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व केले होते.
२३ वर्षीय करीनाने नुकतीच कायद्याची पदवी मिळवली आहे. पेंचाक सिलाटमध्ये अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्यासाठी दर्जेदार कामगीरी केली होती. अंतिम सामन्यातही तीने हाच लय कायम ठेवली. या सामन्यादरम्यान तीचे पालक व मित्रमंडळी कांपाल येथे उपस्थित होती. त्यांचाही पाठींबा तीला वेळोवेळी लाभला.
गोव्याला राष्ट्रीय खेळांमध्ये पेंचाक सिलाटमध्ये लक्षणीय यश मिळाले आहे. यामध्ये अँस्लेट सेबॅस्टियन (महिला ५५-६० किलो), क्लो फुर्ताडो (महिला ७५-८० किलो), आशा नाईक (महिला ६५-७० किलो), मोहम्मद इरफान खान (पुरुष ६५-७० किलो), गणपतराव देसाई (पुरुष ७५-८० किलो), सागर पालकोंडा (पुरुष ८५-९० किलो) आणि सिराज खान (पुरुष ९०-९५ किलो) यांनी कांस्य पदके मिळवून यात महत्वाचा हातभार लावला आहे.
गोव्याने आतापर्यंत एकूण २३ पदके जिंकली असून, यात २ सुवर्ण, ४ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.
मी माझ्या पहिल्याच पेंचाक सिलाट स्पर्धेत राज्यासाठी सुवर्णपदक जिंकू शकले याचा मला खूप आनंद आहे. मला मार्शल आर्ट्स आवडतात आणि त्यामुळेच एक महिन्यापूर्वीच हा खेळ शिकायला सुरुवात केली आणि मला तो आवडला, नंतर या स्पर्धेसाठी खुप मेहनत घेतली, याचे फळ सुवर्ण पदकाच्या रुपाने मिळाले. - करीना शिरोडकर, खेळाडू