पणजी : म्हादई नदीच्या प्रवाहावर तथा कळसा-भंडुरा नाल्यावर कणकुंबी येथे कर्नाटकने बांधलेला बांध स्वत:च फोडला आहे. त्यामुळे प्रवाह पूर्ववत वाहू लागला आहे. तेथील यंत्रसामुग्रीही काढून ती अन्यत्र नेण्यात आली आहे, असे म्हादई बचाव अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर यांनी बुधवारी येथे सांगितले.
केरकर यांनी कणकुंबी येथे बुधवारी दुपारी भेट दिली. त्यावेळी कळसा-भंडुरा नाल्यावर कर्नाटकने बांधलेला बांध फोडलेला असल्याचे त्यांना आढळून आले. पूर्वीप्रमाणोच स्थिती निर्माण केली गेली आहे व त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाहू लागला आहे. गेल्या महिन्यात बांध बांधून हे पाणी अडविले गेले होते, असे केरकर यांचे म्हणणे आहे. कळसा-भंडुरा नाल्याजवळ पूर्वी बरीच यंत्रसामुग्री असायची. ही सामुग्री आता संबंधित कंत्राटदार कंपनीच्या कार्यालयाजवळ नेण्यात आली आहे. गोव्यात खळबळ माजल्यानंतर व गोवा सरकारने लवादाकडे अवमान याचिका सादर करण्याची भूमिका यापूर्वी जाहीर केल्यामुळे कर्नाटकने तो बांध फोडून टाकला असावा असे पर्यावरणप्रेमींना वाटते.
गोवा व कर्नाटकमधील म्हादई पाणी प्रश्न अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे. गोवा सरकारला या वादामुळे टीकेचे धनी व्हावे लागले आहे. कर्नाटकमध्ये गोव्याच्या निषेधार्थ वारंवार बंद पाळले जात आहेत. कर्नाटकला म्हादई नदीचे पाणी देण्यास गोमंतकीयांचा आक्षेप आहे. म्हादई पाणी तंटा लवादासमोर आता अंतिम टप्प्यातील युक्तीवाद सुरू झाले आहेत. अशावेळीच कर्नाटकच्या यंत्रणोने म्हादई नदीच्या प्रवाहावर बांध बांधून पाणी अडविल्याचे वृत्त येऊन गोव्यात धडकले होते. स्वत: केरकर यांनी पाहणी करून बांध बांधण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. गोव्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल आत्माराम नाडकर्णी यांनीही याची गंभीरपणो दखल घेतल्यानंतर मंत्री विनोद पालयेकर तसेच गोव्याच्या अभियंत्यांच्या पथकानेही कणकुंबी येथे कळसा-भंडुरा नाल्याला भेट दिली होती. गोव्याचे मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांनी गेल्या पंधरवडय़ात कर्नाटक सरकारला पत्र लिहिले व कर्नाटकने बांध बांधून न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याचे नमूद केले होते. त्यावर गेल्या सोमवारी कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी पत्र पाठवून आम्ही फक्त बांधकामविषयक कचरा काढला व कोणत्याच न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही असा दावा केला.