पणजी - मासे आयात बंदी गोव्याच्या अन्न व औषध प्रशासन खात्याने (एफडीए) तूर्त उठवावी किंवा स्थगित ठेवावी अशी मागणी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पत्र लिहून केलेली असली तरी, आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी ही मागणी मान्य करता येणार नाही, अशी भूमिका शुक्रवारी येथे जाहीर केली. जोर्पयत एफडीएच्या सूचनांचे पालन मासळी वाहतुकदार व व्यापारी करत नाहीत, तोर्पयत बंदी मागे घेतली जाणार नाही, असे मंत्री राणो यांनी सांगितले.
कर्नाटकमधील मासळी वाहतूकदार गोव्याच्या एफडीएच्या सूचनांचे पालन करील व त्यासाठी आवश्यक प्रमाणपत्रेही प्राप्त करतील. फक्त पालन होईर्पयत गोवा सरकारने मासळी आयात बंदी निलंबित करावी, अशी विनंती कर्नाटकने केलेली आहे. स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहून गोवा व कर्नाटकमधील मासळी व्यापार सुरूच रहावा, असे म्हटले आहे. त्याविषयी बोलताना मंत्री राणो म्हणाले, की
गोवा सरकारने लागू केलेल्या सूचना म्हणजे आयात बंदी नव्हे. गोव्यातील लोकांच्या आरोग्याच्यादृष्टीने काळजी म्हणून सूचना लागू केल्या. मात्र जोर्पयत त्यांचे पालन होत नाही तोर्पयत बंदी निलंबित केली जाणार नाही. महाराष्ट्र व कर्नाटकमधील छोटय़ा मासळी विक्रेत्यांची अडचण होऊ नये म्हणून आम्ही गोव्यात तपास नाके उभे करून माशांची छाननी करू. त्यादृष्टीने नेमके काय करता येईल याचा अभ्यास सुरू आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे पत्र मिळाले आहे पण आम्ही बंदी निलंबित करणार नाही. पर्यटन व्यवसायावर परिणाम होऊ नये म्हणून आम्ही वेगळी उपाययोजना करू, असे मंत्री राणो म्हणाले.
............