पणजी : कर्नाटक विधानसभा निवडणूक निकालाचा गोवा सरकारमधील समीकरणांवर विविध अर्थानी परिणाम होणार आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारमधील भाजपाचे स्थान आता बळकट बनणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कर्नाटकमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळाल्यानंतर गोव्यातील भाजपामध्ये आनंदोत्सव सुरू झाला. या उलट सरकारमधील जे असंतुष्ट घटक आहेत त्यांच्या मनोधैर्यावर परिणाम झाल्याचे लगेच जाणवू लागले आहे. यापुढील दिवसांत हा बदल ठळकपणे दिसून येईल.
गोव्यात नाईलाजास्तव भाजपाला गोवा फॉरवर्ड, मगोप आणि अपक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला होता. तथापि, मनोहर पर्रीकर यांना दिल्लीहून भाजपाने गोव्यात आणले व गोवा फॉरवर्ड, काही अपक्ष व मगो पक्षाला सोबत घेऊन सरकार बनविले. भाजपाला स्वत:च्या पद्धतीने गोवा सरकार गेले वर्षभर चालविता आले नाही. गोवा फॉरवर्ड, मगोप आणि अपक्ष मंत्र्यांच्या कलाने घेत पर्रीकर यांच्याकडून सरकार चालविण्याच्या केवळ कसरती केल्या जात होत्या. सरकारमध्ये पीडीए, प्रादेशिक आराखडा आणि अन्य विषयांवरून ब्लॅकमेलिंगचेही राजकारण सुरू होते.
भाजपा यामुळे हळूहळून जेरीस येऊ लागला होता. आता मध्यावधी निवडणुकांना भाजपा सामोरा जाईल काय असा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळीच मुख्यमंत्री पर्रीकर यांना गंभीर आजाराने गाठले व गेले अडीच महिने ते अमेरिकेत उपचार घेत आहेत. यामुळे मुख्यमंत्री पर्रीकर याना व भाजपालाही सरकारमधील घटक पक्षांवर आणि अपक्षांवर जास्त अवलंबून राहावे लागले. मात्र कर्नाटकमधील निवडणुकीच्या निकालाने गोव्यातील भाजपाच्या अंगावरीलही मांस वाढले आहे. घटक पक्षांचे व अपक्षांचे दबावाचे राजकारण आता गोव्यात देखील भाजपा खपवून घेणार नाही, गरज पडल्यास भाजपा लोकसभा निवडणुकीसोबत गोवा विधानसभेच्या निवडणुकीलाही सामोरा जाऊ शकतो, असे राजकीय विश्लेषकांकडून मानले जात आहे.
सोशल मीडियावरून तर तशीच चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री पर्रीकर यांचे अमेरिकेतूनही कर्नाटकच्या निवडणूक निकालावर लक्ष होते. कर्नाटकमध्ये काय होईल असे आपल्याला पर्रीकर यांनी फोनवरून शनिवारीच विचारले, असे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनीही रविवारी गोव्यात एका सभेवेळी नमूद केले होते.