किशोर कुबल, पणजी: म्हादई प्रश्नी 'प्रवाह' प्राधिकरणाने संयुक्त पाहणी करण्याची तयारी दर्शवणारे पत्र गोव्याला पाठवल्याच्या पार्श्वभूमीवर येत्या सोमवार, मंगळवारपर्यंत राज्य सरकार आपला व्हिजिट प्लॅन 'प्रवाह'ला सादर करणार आहे. म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकने जे काम चालवले आहे ते बंद पाडण्याची मागणी संयुक्त पाहणीच्या वेळी केली जाईल, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, गोवा कर्नाटक व महाराष्ट्र या तिन्ही संबंधित राज्यांना प्रवाह प्राधिकरणाने पत्रे लिहून संयुक्त पाहणणीसाठी प्रत्येक राज्याच्या सवडीनुसार तारखा मागवलेल्या आहेत. महाराष्ट्र सरकारने त्यांचा व्हिजिट प्लॅन प्राधिकरणाला कळवला आहे. आमच्या तारखा व या भागात कुठे पाहणी करण्याची आहे त्याविषयी विस्तृत माहिती येत्या सोमवार किंवा मंगळवार सकाळपर्यंत प्राधिकरणाला सादर करू.'
शिरोडकर म्हणाले की, 'प्रवाह प्राधिकरणाची स्थापना झाल्यानंतर १० डिसेंबर २०२३ रोजी राज्य सरकारने पहिले पत्र प्राधिकरणाला लिहिले त्यानंतर प्राधिकरणाची १३ फेब्रुवारी रोजी एक बैठकही झालेली आहे. कर्नाटकने पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी चालवलेले उत्खनन तसेच इतर बांधकामाविषयी संयुक्त पाहणीच्या वेळी आम्ही तक्रार करणार आहोत. पाण्याच्या वेळी आमच्यासोबत खात्याचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य अभियंता, अतिरिक्त अभियंता, सचिव व इतर असतील.
प्रवाह प्राधिकरणाकडे आतापर्यंत चारवेळा व्यवहार झालेले आहे. २२ मार्च रोजी चौथे पत्र पाठवले. कर्नाटकने काम चालू ठेवल्याने गोवा सरकारने वेळोवेळी तक्रार केलेली आहे. प्रवाहचे अध्यक्ष संयुक्त पाहणी नेमकी कुठे करावी, याबाबत निर्णय घेतील. आम्ही आमचा प्लॅन देणार आहोत, असे शिरोडकर यांनी सांगितले.