लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : कर्नाटकने म्हादईचे पाणी मलप्रभेत वळवण्यासाठी नव्याने काम चालवले असून जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर जो काही यांनी कर्नाटक बेकायदेशीरपणा करत आहे, त्याची किंमत त्या राज्याला मोजावी लागेल., असा इशारा देताना "प्रवाह" प्राधिकरण किंवा सुप्रीम कोर्टात कर्नाटकचे काहीच चालणार नाही. म्हादईबाबतीत गोव्याची बाजू भक्कम आहे, असे म्हटले आहे.
म्हादईचे वळवण्याचे काम कर्नाटकने नव्याने सुरू केले आहे असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केला होता व सरकारने याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी केली होती. लोकमतच्या या प्रतिनिधीने मंत्री शिरोडकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील भाष्य केले.
कर्नाटकने कलशातून मलप्रभा खोऱ्यात पाणी वळवण्यासाठी नाल्यावर बांधकाम सुरू केले आहे, अशी माहिती देताना सरदेसाई यांनी सुरू असलेल्या कामांची व्हिडिओ क्लिप शेअर केली होती. त्यांनी पुढे असेही निदर्शनास आणून दिले की सभागृह समितीची बैठक बोलावण्याची वारंवार विनंती करूनही सरकारने तसे करण्याची तसदी घेतली नाही. "कर्नाटककडे गोव्याने घोर शरणागती पत्करली असून गोवेकरांना भविष्यात पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.
भाजपचे कर्नाटकचे २८ खासदार निवडून आले पाहिजेत यासाठी केंद्राकडूनही कर्नाटकला झुकते माप दिले जात आहे असा आरोप त्यांनी पुढे केला होता. सरकारने स्पष्टीकरण देऊन म्हादई नदीबाबत नेमके काय चालले आहे ते स्पष्ट करावे, अशी मागणी सरदेसाई यांनी केली होती.