पणजी : खाण घोटाळा प्रकरणात कारवारचे आमदार सतीश सैल यांनी आज दुपारी येथील पोलिसांच्या विशेष तपास अधिकाऱ्यांसमोर (एसआयटी) हजेरी लावली. तब्बल दोन तास त्यांची चौकशी झाली. त्याआधी सकाळी येथील सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. दुपारी ४ वाजता आणि त्यानंतर पोलिसांना आवश्यकता भासेल तेव्हा चौकशीला हजर राहण्याची अट त्याना घालण्यात आली आहे. सकाळी सैल यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुनावणीसाठी आला असता पोलिसांनी आपले म्हणणे मांडण्यासाठी मुदत मागून घेतली. त्यानंतर न्यायालयाने सैल यांना सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर केला. दुपारी ४ वाजता सैल हे रायबंदर येथील एसआयटी अधिकाºयांसमोर दाखल झाले. निरीक्षक दत्तगुरु सावंत यांनी पोलिस अधिक्षक कार्तिक कश्यप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची तब्बल दोन तास चौकशी केली. सायंकाळी ६ च्या सुमारास त्यांना जाऊ देण्यात आले. या आमदाराचा खाण घोटाळ्याशी प्रत्यक्ष सहभाग असल्याचे पुरावे एसआयटीला मिळाले आहेत. विशेषत: खनिज निर्यात प्रकरणात त्याचा सहभाग असल्याचा पोलिसांचा दावा आहे. एसआयटीने याआधी अटक केलेल्या काही ट्रेडर्समुळे सैल यांचा या खाण घोटाळ्यातील सहभाग उघड झाला आहे. या ट्रेडर्सकडून त्यांनी चोरीचा खनिजमाल विकत घेतल्याचा संशय आहे. सैल हे कारवारचे अपक्ष आमदार असून त्यांचा सदाशिवगड येथे बंगला आहेव कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे. सैल हे मल्लिकार्जुन शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड या निर्यातदार कंपनीचे संचालक आहेत. गोव्यातून बेकायदेशीररीत्या वाहतूक करण्यात आलेले लोह खनिजमाल ट्रेडर्सद्वारे या कंपनीला पुरविला जात होता. या कंपनीकडून त्याची नंतर निर्यात केली जात होती. खाण घोटाळ्यातील संशयित ट्रेडर्सच्या नोंदवहीत मल्लिकार्जुन शिपिंगचा उल्लेख आढळला आहे. २00७ ते २0१२ या काळात गोव्यात झालेला बहुतांश खनिजोद्योग हा बेकायदेशीर होता; लिजांचे नूतनीकरण न करताच खाणींतून खनिजाचे बेकायदा उत्खनन खाण उद्योजकांनी मोठ्या प्रमाणावर चालू ठेवले. कोट्यवधी रुपयांचे खनिज सरकारला रॉयल्टीही न देता निर्यात करण्यात आले होते. या प्रकरणात चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेल्या एम. बी. शहा आयोगाने नंतर तब्बल ३५ हजार कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आणला होता. दरम्यान, बेल्लारी खाण घोटाळ्यातही सैल यांचा सहभाग असल्याचा ठपका सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीने याआधी ठेवला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडून त्यासाठी त्याला अटकही केली होती.
कारवारचे आमदार सतीश सैल यांची गोव्यात खाण घोटाळा प्रकरणात तब्बल दोन तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2018 7:24 PM