लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : धर्माच्या नावाने विनाकारण पोलिस स्थानकात जाऊन कोणीही तणाव निर्माण करू नये. एकमेकांच्या धर्माच्या बाजूने विषय काढून वाद करणे थांबवा. राज्यात सामाजिक सलोखा राखण्यासाठी धार्मिक तणाव निर्माण न करता संयम बाळगा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त सकाळी जुने गोवे येथील गांधीजींच्या पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. काही दिवसांपूर्वी जुलूसवरून निर्माण झालेला वाद पोलिस स्थानकांपर्यंत पोहोचला होता. त्यावेळी दोन धर्मामध्ये तणावही निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी सर्वधर्मीयांना जातीय सलोखा राखण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमास कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई, उत्तर गोवा जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, स्थानिक सरपंच, पंच सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, की भारत महासत्ता बनावा हे प्रत्येकाचे स्वप्न आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचे ध्येय समोर ठेवले आहे. त्यामुळे विकसित भारत व विकसित गोवा बनण्यासाठी प्रत्येकाने हातभार लावण्याची गरज आहे. सत्य व अहिंसेच्या वाटेवर जावे, असे आवाहनही त्यांनी केले.
वोकल फॉर लोकल, मेक इन इंडिया म्हणजेच स्थानिकांकडून तयार केल्या जाणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यामुळे सरकारच्या महसुलातही भर पडत आहे. देशातून भ्रष्टाचार नष्ट करणे, लोकांना सुशासन मिळाले, गावागावांमध्ये असलेल्या महिला स्वयंसाहाय्य गटांना प्रोत्साहन देऊन त्यांना स्वयंपूर्ण करणे, तरुणांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देतानाच रोजगार उपलब्ध करणे, यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी म्हटले.
विकासासाठी एक व्हा...
महात्मा गांधी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन देशवासीयांना स्वच्छतेचा संदेश दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वच्छतेवर भर देण्याचे ठरवले आहे. स्वच्छतेप्रमाणेच देशातील प्रत्येक घटकापर्यंत, धर्मापर्यंत, तळागाळातील लोकांपर्यंत रस्ते, वीज, पाणी, विमा योजना, तसेच अन्य सरकारी योजना पोचाव्यात, यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवाअंतर्गत सरकार काम करीत आहे. दिव्यांगांबरोबरच अंत्योदय तत्त्वावर समाजातील प्रत्येक घटकाला योजनांचा लाभ मिळावा यासाठीही प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
'डीएनए'ची मागणी जुनीच, उगाच धार्मिक रंग देऊ नका
फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाच्या डीएनएची मागणी जुनीच आहे. यासंदर्भात श्रीलंकेत एक चळवळ सुरू असून ते शव झेवियर यांचे नसून बौद्धभिक्षू राहुल थेरा यांचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याबाबत २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी व महिंद्र राजपक्षे यांना निवेदनही दिले आहे. श्रीलंकेच्या लोकांनी जी मागणी भारत व श्रीलंकेच्या राष्ट्रप्रमुखांकडे केली आहे. तीच मागणी हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने संशयाच्या वादावर कायमचा पडदा पडावा म्हणून आम्ही केली आहे. याचा विपर्यास करून त्याला धार्मिक रंग देणे चुकीचे आहे. - प्रा. सुभाष वेलिंगकर.
काही लोक राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवत आहेत. मात्र त्यांनी राज्याची एकता बिघडवू नये, तसेच राज्यातील पुरातन वास्तू व इतर धार्मिक गोष्टींची बदनामी तातडीने थांबवावी. - सदानंद तानावडे, खासदार.
समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांचे गोव्याबाहेर पुनर्वसन करा. सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांच्याविषयी वेलिंगकरांनी वापरलेले शब्द हे राज्यातील भू-बळकाव, डोंगरफोड अशा महत्त्वाच्या मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे. - वेंझी व्हिएगश, आमदार.
देव-देवतांचा, संतांचा अपमान करीत असाल तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. कोणी धर्माविषयी चुकीचे विधान केल्यास आपण त्याविरोधात आवाज उठवू. राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवणाऱ्यांवर मुख्यमंत्र्यांनी कठोर करवाई करणे गरजेचे आहे. एल्टन डिकॉस्टा, आमदार.