विकासासाठी काम करत रहा, प्रतापसिंह राणेंचा झेडपी सदस्यांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2020 01:28 PM2020-12-15T13:28:42+5:302020-12-15T13:29:00+5:30
Goa News : सत्तरी तालुक्यातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या झेडपी सदस्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांची मंगळवारी भेट घेतली. सत्तरीच्या विकासासाठी काम करत रहावे असा सल्ला राणे यांनी या भेटीवेळी झेडपी सदस्यांना दिला.
पणजी - सत्तरी तालुक्यातून भाजपच्या तिकीटावर निवडून आलेल्या झेडपी सदस्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापसिंग राणे यांची मंगळवारी भेट घेतली. सत्तरीच्या विकासासाठी काम करत रहावे असा सल्ला राणे यांनी या भेटीवेळी झेडपी सदस्यांना दिला.
जिल्हा पंचायतींच्या नगरगाव, केरी, होंडा या मतदारसंघातून काँग्रेसचा पराभव करत भाजपचे सदस्य निवडून आले. राज्यातील भाजप सरकारमध्ये आरोग्य मंत्री असलेल्या विश्वजित राणे यांनी या सदस्यांच्या प्रचाराचे नेतृत्व केले होते. पर्ये विधानसभा मतदारसंघात जे झेडपी मतदारसंघ येतात तिथेही प्रथमच भाजपचे झेडपी निवडून आले. सत्तरी व उसगाव गांजे अशा भागातील चारही झेडपी सदस्य मोठी आघाडी मिळवून विजयी झाले. या सदस्यांनी विश्वजित यांच्यासोबत मंगळवारी माजी मुख्यमंत्री राणे यांची भेट घेतली. कुळण येथील राणे यांच्या खासगी निवासस्थानी जाऊन हे सदस्य राणे यांना भेटले.
आपण व झेडपी सदस्यांनीही आपले वडिल प्रतापसिंग राणे यांचे आशीर्वाद घेतले. कारण राणे हे सत्तरीचे मोठे नेते आहेत. नव्यानेच निवडून आलेल्या झेडपी सदस्यांनी झेडपी मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत रहावे असा सल्ला राणे यांनी सर्वांना दिल्याचे मंत्री विश्वजित यांनी पत्रकारांना सांगितले.
देवयानी गावस, सगुण वाडकर, राजश्री काळे व उमाकांत गावडे हे चार झेडपी सदस्य सत्तरी तालुका व उसगाव भागातून निवडून आले आहेत. उत्तर गोव्यात सत्तरी हा एकमेव तालुका असा ठरला जिथे भाजपचा एकही उमेदवार झेडपी निवडणुकीत पराभूत झाला नाही व काँग्रेसचा एकही उमेदवार जिंकला नाही. उसगाव गांजे झेडपी मतदारसंघातून उमाकांत गावडे हे ४,५३४ मते घेऊन विजयी झाले. होंडा झेडपी मतदारसंघातून सगुण वाडकर हे ५,३५९ मते मिळवून विजयी झाले. केरीमधून देवयानी गावस यांनी ६ हजार ८०२ मते मिळवली. नगरगाव झेडपी मतदारसंघातून राजश्री काळे यांनी ६ हजार ६५२ मते प्राप्त करत विजय प्राप्त केला. मंत्री विश्वजित हे २०१७ सालापासून भाजपचे आमदार व मंत्री आहेत.