पणजी: सक्तवसुली संचालनायालयाकडून (इडी) आम आदमी पार्टीचे संयोजक अमित पालेकर रामराव वाघ यांच्यासह चौघांची गुरुवारी चौकशी केली.
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाचे कनेक्शन गोव्याशी आढळून आल्याचा दावा ईडीने केला आहे. आणि त्याच अनुषंगाने गोव्यात अनेक जणांची चौकशी सुरू आहे. बुधवारी ईडीने आम आदमी पार्टीचे संयोजक अमित पालेकर आणि रामराव वाघ यांना समन्स बजावले होते. गुरुवारी त्यांना इडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार अमित पालेकर, रामराव वाघ, दत्तप्रसाद नाईक आणि अशोक नाईक हे चौकशीसाठी उपस्थित राहिले होते. आश्चर्य म्हणजे चौकशीसाठी उपस्थित राहण्यासाठी सकाळी हे सर्व नेते आले, त्यावेळीही माध्यमांशी बोलणे त्यांनी टाळले आणि ईडी कार्यालयातून बाहेर पडल्यावरही त्यांनी इडीच्या समंस विषयी आणि चौकशी विषयी बोलणे टाळले.
तुम्हाला समन्स का बजावण्यात आले होते आणि चौकशी कशासाठी आहे. चौकशीत त्यांनी तुम्हाला काय विचारले असे पालेकर यांना विचारले असता त्यांनी याविषयी चौकशी सुरू असताना आपण बोलणे योग्य ठरणार नाही, असे सांगून उत्तर देणे टाळले. अधिकाऱ्यांनी आपल्याकडे काही माहिती मागितलेली आहे ही माहिती घेऊन आपण पुन्हा कार्यालयात येणार आहे, असेही ते म्हणाले. रामराव वाघ यांनीही चौकशी विषयी बोलणे टाळले. मद्य विक्रेते संघटनेचे दत्तप्रसाद नाईक तसेच भंडारी समाज संघटनेचे अध्यक्ष अशोक नाईक हेही काही बोलले नाहीत.
मात्र त्या ठिकाणी आलेले आम आदमी पार्टीचे नेते वाल्मिकी नायक यांनी मात्र भाजप सरकारकडून हा अधिकाराचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला. आझाद मैदानातील आजची निदर्शने भाजपच्या जिव्हारी लागली आहेत त्यामुळेच ही सतावणूक सुरू आहे, असे त्यांनी म्हटले आहे.