लोकमत न्यूज नेटवर्क, केपे : केपे मतदारसंघातील भाजपच्या जुन्या व नव्या कार्यकर्त्यांचे मनोमीलन झाले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत कोणतीही कसर न राहता केप्यात पुन्हा भाजपचेच कमळ फुलणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री आपल्याला भाजपमध्ये बोलवत असतात, असे वक्तव्य करणाऱ्या काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्टा यांना आपण बोलावले नसल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच भाजपला त्यांना बोलावण्याची गरजही नसल्याचेही ते म्हणाले.
केपे भाजप मंडळाच्या फातर्पा येथील श्री शांतादुर्गा भूमिपुरुष सप्तकोटेश्वर संस्थान सभागृहात झालेल्या मेळाव्यात मुख्यमंत्री बोलत होते. व्यासपीठावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, भाजपचे राज्य सचिव सर्वानंद भगत, दक्षिण गोवा अध्यक्ष प्रभाकर गावकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष संजना वेळीप, उपाध्यक्ष सिद्धार्थ गावस देसाई, जिल्हा पंचायत सदस्य खुशाली वेळीप व शाणू वेळीप, फातर्पाच्या सरपंच मनिषा देसाई, बार्सेचे सरपंच मोहन गावकर, खोलाच्या सरपंच प्रियांका वेळीप उपस्थित होत्या.
केपे मतदारसंघात होत असलेल्या विकासकामांचे श्रेय विद्यमान आमदारांनी घेऊ नये. केपे मतदारसंघात होत असलेली विकासकामे ही माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी आपल्या कारकीर्दीत नियोजन व मंजूर करून घेतली होती. कोविड काळात ही कामे प्रलंबित राहिली होती, आता त्या कामांचे श्रेय विद्यमान आमदार घेत आहेत. ही कामे पूर्ण होण्यासाठी वित्तमंत्री व मुख्यमंत्री म्हणून आपण सहकार्य करत आहोत. त्यामुळे या कामांचे श्रेय आपणास व कवळेकर यांना मिळायला हवे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ओएनजीसीच्या संकुलात बांधलेल्या पंचायत घराचे श्रेय हे राज्य सरकार व केंद्र सरकारला जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मंडळ अध्यक्ष कृपेश वेळीप यांनी स्वागत तर सरचिटणीस दयेश नाईक यांनी सूत्रसंचालन केले. सरचिटणीस अर्जुन वेळीप यांनी आभार मानले.
गोव्यात दिसणारा विकास हा भाजपच्या डबल इंजिनमुळेच झालेला आहे, असे दामू नाईक यांनी सांगितले. यापूर्वी २००४ ते २०१२ पर्यंत काँग्रेसच्या डबल इंजिनचे सरकार होते. पण, या काळात गोव्यात कोणताही विकास झाला नाही. भाजप सरकारने जनतेला आधार मिळेल अशा योजना लागू केल्या व या योजनांचा जनतेला मोठा लाभ मिळाला, असे नाईक म्हणाले. केपे मतदारसंघात सुरू असलेल्या विविध कामांचे प्रस्ताव आपण मंजूर करून घेतले होते. विद्यमान आमदारांनी त्याचे श्रेय घेण्याचे काम केले, असे कवळेकर म्हणाले.
'३८ हजार कोटी कर्जाचेही श्रेय घ्या'
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांनी आमदारांच्या विकासकामांवरील श्रेय लाटण्याच्या वक्तव्याला प्रतिउत्तर देताना, मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या ३८ हजार कोटी कर्जाचेही श्रेय घ्यावे, अशी टीका केली. राज्यभरातील विकासकामे ही जनतेच्या पैशातून होत असून या विकासाचे श्रेय हे लोकांचे आहे, असेही यांनी सांगितले. चांदर येथे एका कार्यक्रमदरम्यान आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांच्या श्रेय लाटण्याच्या वक्तव्याला प्रतिउत्तर दिले. आलेमाव म्हणाले, की राज्यात होणारा विकास हा प्रत्येक मतदारसंघातील आमदारामुळे होत असतो. याचे कारण म्हणजे आमदार आपल्या मतदारसंघातील विविध कामे आणि त्याच्याशी निगडित ठराव हे सरकार दरबारी पोहोचवत असतो. मुख्यमंत्र्यांनी जे श्रेय लाटण्याची भाष्य केले आहे, ते श्रेय खरे तर जनतेचे आहे.