गोव्यात सत्तेची चावी घटक पक्षांच्याच हाती
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 02:31 PM2018-09-18T14:31:25+5:302018-09-18T14:38:26+5:30
गोव्यात पडद्यामागून ब-याच राजकीय हालचाली सुरू असून विरोधी काँग्रेस पक्षही सत्ता बदलासाठी खूप सक्रीय झालेला आहे.
- सदगुरू पाटील
पणजी : गोव्यात पडद्यामागून ब-याच राजकीय हालचाली सुरू असून विरोधी काँग्रेस पक्षही सत्ता बदलासाठी खूप सक्रीय झालेला आहे. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे एम्स इस्पितळामधून कधी बाहेर येऊ शकतील याची कल्पना कुणालाच नसल्याने व बहुतेक मंत्री, आमदार राजकीय लॉबिंगमध्येच दंग असल्याने प्रशासनाचे तीनतेरा वाजले आहेत. मात्र काहीही झाले तरी, शेवटी गोव्यातील सत्तेची चावी ही भाजपाच्या नव्हे तर भाजपाप्रणीत आघाडीतील दोन घटक पक्षांच्याच हाती आहे, असा निष्कर्ष प्राप्त स्थितीत काढावा लागतो.
भाजपाकडे मुख्यमंत्रीपद असले तरी, त्या पक्षाकडे चाळीस सदस्यीय विधानसभेत फक्त चौदाच आमदार आहेत. त्या चौदापैकी एकटे सभापतींच्या खुर्चीवर बसतात आणि तिघे इस्पितळात आहेत. विधानसभेत जर सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगितले गेले तर तीनपैकी दोन आमदार मतदानासाठी विधानसभेत येऊही शकणार नाहीत. सध्या भाजपाकडे अकराच आमदारांचे संख्याबळ असल्यासारखी स्थिती आहे. अमेरिकेत उपचार घेत असलेले ज्येष्ठ मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे 15 ऑक्टोबरनंतर गोव्यात पोहोचतील असे सांगण्यात येते. मुंबईतील इस्पितळात गेले चार महिने उपचार घेत असलेले वीजमंत्री पांडुरंग मडकईकर यांच्याशी सरकारचा आणि सत्ताधारी भाजपाचाही काहीच संपर्क राहिलेला नाही.
सत्तेची चावी सध्या तरी भाजपाप्रणीत आघाडीचे घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक ह्या दोन पक्षांच्या व तिघा अपक्षांच्या हाती आहे. मंत्री विजय सरदेसाई यांच्या गोवा फॉरवर्ड पक्षाने तिघा अपक्षांना सोबत घेऊन एकूण सहा आमदारांची मोट बांधलेली असल्याने फॉरवर्डचे राजकीय वजन सत्ताधारी आघाडीत वाढलेले आहे. गोव्यातील नेतृत्वाच्या स्थितीवर कायमस्वरुपी तोडगा काढला जावा, अशा प्रकारची सूचना भाजपाच्या केंद्रीय निरीक्षकांना सहा आमदारांनी मिळून केली. चाळीस सदस्यीय विधानसभेत एखाद्या गटाकडे सहा आमदार असणो हे खूप महत्त्वाचे ठरते. सहा आमदारांचे नेतृत्व करत असलेल्या नेत्याला वगळून पुढे जाता येत नाही याची कल्पना गोव्याहून दिल्लीला परतलेल्या भाजपाच्या निरीक्षकांना आली आहे. दुस-या बाजूने तीन आमदारांचा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा नेतृत्वाची तात्पुरती धुरा आपले नेते मंत्री सुदिन ढवळीकर यांच्याकडे सोपवा अशी मागणी करत आहे. मात्र ती मागणी पूर्ण होणार नाही. तथापि, दुखावलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष जाऊन काँग्रेसच्या गळाला लागू नये म्हणूनही भाजपला काळजी घ्यावी लागेल. कारण काँग्रेसचे सोळा, मगोपचे तीन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक असे संख्याबळ एकत्र आले व तिघा अपक्षांपैकी एक अपक्ष गळाला लागला तर काँग्रेस विधानसभेत बहुमत दाखवू शकेल.
केंद्रातील भाजपाचे नेते कोणत्याही स्थितीत तसे होऊ देणार नाही व काँग्रेसला पुन्हा सत्तेच्या खुर्चीवर बसू देणार नाहीत. मात्र गोवा फॉरवर्ड व महाराष्ट्रवादी गोमंतक ह्या दोन पक्षांच्याच हाती तुर्त सगळ्य़ा चाव्या आहेत याची जाणीव गेल्या आठवडाभरातील हालचालींनंतर गोव्यातील भाजपच्या कोअर टीमलाही झालेली आहे, अशी माहिती मिळते.