लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या हैदराबादच्या दोघा नागरिकांचे अपहरण करून त्यांना ओलीस ठेवून त्यांच्या कंपनीकडून ४ कोटी रुपये खंडणी मागणाऱ्या ११ जणांच्या गँगला क्राईम बँचने शनिवारी जेरबंद केले.
हैदराबाद पोलिसांच्या एका टीमने आगशी पोलिसांशी संपर्क करून ही अपहरणाची धक्कादायक माहिती दिली. हैदराबादमधील दोघांना गोव्यात कुठेतरी ओलीस ठेवण्यात आले आहे आणि संशयित अपहरणकर्ते त्यांच्या सुटकेसाठी संबंधितांच्या हैदराबादस्थित कंपनीकडे मोठी रक्कम रक्कम मागत आहेत, असे त्यांनी सांगितले. ही माहिती मिळाल्यावर अतिरिक्त अधीक्षक राजू राऊत देसाई यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांच्या एका टीमने शोधमोहीम सुरू केली. अत्यंत हुशारीने पोलिसांनी या अपहरणकर्त्यांना गाठले आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या. अपहरण केलेल्यांना बांबोळी येथील एका इमारतीत बंदी बनविण्यात आले होते.
पोलिसांनी अल्ताफ शा सैयद (फातोर्डा), सुनील नायक (सांगे), निखिल पाटील (शांतीनगर फोंडा), शफी उल्ला (मडगाव), जाफर शेख हसन, सागर (दोघेही रा. म्हापसा), निशांत (पर्वरी), अस्लम सय्यद मुजावर (मडगाव), सादीक शेख (नावेली), तुकाराम दोंडे (हैदराबाद), जोस एल्ड्रिन (केपे) अशी संशयितांची नावे आहेत. दरम्यान हैदराबादस्थित कंपनीकडे या संशयितांनी खंडणी मागितल्यावर कंपनीने तेथे पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली होती.
मास्टरमाइंडचे पीएफआय कनेक्शन
अल्ताफ हा या प्रकरणातील मास्टरमाइंड आहे. अल्ताफ हा देशविघातक कारवायांसाठी बंदी घातलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेचा सदस्य आहे. तो पीएफआयला पैसे पुरवित होता, असा त्याच्यावर आरोपही होता. आयकर खात्याकडूनही त्याच्यावर छापा टाकला होता. तसेच त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे, असे क्राईम ब्रँचचे अधीक्षक निधीन वाल्सन यांनी सांगितले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"