मडगाव: चार महिन्यांपूर्वी बेपकेगाळ-कुडचडे येथील सुकोरिना ट्रावासो या 52 वर्षीय महिलेचा खून करुन नंतर फरार झालेल्या श्याम देविदास या संशयिताला सोमवारी रात्री मडगाव रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आली. संशयिताने आपला गुन्हा कबूल केला असून पैशांच्या वादातून आपण हा खून केल्याची कबुली त्याने दिल्याची माहिती केपेचे उपअधीक्षक उत्तम राऊत देसाई यांनी दिली.
6 जुलै 2018 रोजी घरात एकटीच असताना त्या महिलेचा खून करण्यात आला होता. त्यासाठी कोयत्याचा वापर करण्यात आला होता. संशयित देविदास याला अटक केल्यानंतर त्याच्याकडून खून केलेला कोयता पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, ज्या महिलेचा खून झाला होता तिचा मृतदेह विवस्त्रवस्थेत सापडला होता. त्यामुळे संशयिताने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना याचीही चौकशी कुडचडे पोलीस करीत आहेत.
केपेचे उपअधीक्षक राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, सदर संशयिताची पाश्र्र्वभूमी गुन्हेगाराची असून काही लैंगिक स्वरुपाच्या गुन्हय़ातही यापूर्वी त्याचा सहभाग होता. त्यामुळेच त्याने त्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न तर केला नाही ना आणि या कृत्याला विरोध केल्यानंतर ती महिला त्याची बाहेर वाच्यता करणार या भीतीने खून तर केला नाही ना या कोनातूनही पोलीस तपास करीत आहेत.मडगावच्या कोकण रेल्वे पोलिसांकडून सोमवारी रात्री संशयिताला अटक करण्यात आली होती. कोकण रेल्वे पोलीस स्थानकाचे निरीक्षक राम आसरे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, गँगरेप प्रकरणातील फरार झालेला संशयित ईश्र्वर मकवाना याला पकडण्यासाठी सर्व पोलिसांना सतर्क केले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकावरही गस्त कडक केली होती. रात्रीच्यावेळी प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर संशयित बसलेला पाहिल्यावर त्याला अटक करण्यात आली. मागाहून कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी त्याचा ताबा घेतला.
उपअधीक्षक राऊत देसाई यांनी दिलेल्या माहितीप्रमाणो, संशयिताने दिलेल्या कबुलीप्रमाणो, ज्या दिवशी हा खून झाला त्याच्या काही दिवसांपूर्वी सदर महिलेने आपल्या घराजवळ असलेली झाडे कापण्याचे काम त्याला दिले होते. या कामाच्या पैशांसाठी त्याने तिच्याकडे तगादा लावला होता. पैसे न दिल्यामुळेच आपण सुकोरिनाचा खून केला अशी कबुली संशयिताने पोलिसांना दिली. ज्यावेळी हा खून झाला होता त्यावेळी मयताच्या मुलीनेही श्यामवर संशय व्यक्त केला होता. त्यामुळे कुडचडे पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआऊट नोटीसही जारी केली होती.
यापूर्वीही या संशयिताने अशाप्रकारचे काही गुन्हे करुन कर्नाटक राज्यात आसरा घेतला होता. त्याची ही सवय पोलिसांना माहीत असल्यामुळे त्याला अटक करण्यासाठी कर्नाटक राज्यात पोलीसही पाठविले होते, पण तो त्यांना सापडला नव्हता. संशयिताने दिलेल्या कबुलीप्रमाणो हा खून केल्यानंतर रेल्वेने तो पनवेल-मुंबई येथे गेला. तिथे त्याने 400 रुपयांच्या रोजीवर कामगार म्हणून काम सुरु केले. सुमारे चार महिने तो पनवेलला होता. रात्रीच्यावेळी पनवेल रेल्वे स्थानकावर तो आसरा घेत होता. त्यानंतर रेल्वेने तो मंगळुरुत आला. पण तिथे मनासारखे काम न मिळाल्यामुळे पुढे हसन जिल्हय़ात रवाना झाला. तिथे महिनाभर एका बांधकाम साईटवर हमालाचे काम केल्यानंतर 8 डिसेंबरला तो गोव्यात आला होता अशी माहिती प्राप्त झाली आहे.
शोधत होते मकवानाला, सापडला श्याममागचे चार महिने खून करुन फरार असलेल्या या संशयिताला अटक करण्यामध्ये मडगाव कोकण रेल्वे स्थानकाच्या एल.आय.बी. पथकाने मोलाची कामगिरी निभावली. हवालदार सुभाष नाईक तसेच पोलीस शिपाई रमाकांत देसाई, निलेश कासकर, राघेश नाईक व विशाल वेळीप यांनी ही कामगिरी केली. वास्तविक हे पथक फरार गँगरेप आरोपी मकवानाच्या मागावर होते. त्यामुळे सर्व संशयित व्यक्तींची ते बारकाईने चौकशी करत होते. अशातच प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर सदर संशयित बसलेला त्यांना दिसला. त्याच्या हालचाली संशयास्पद दिसल्याने त्यांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे मागचे चार महिने एकप्रकारे गुढ राहिलेल्या खुनाचा वाचा फुटली. योगायोगाची बाब म्हणजे यापूर्वी बेताळभाटी सामुहिक बलात्कार प्रकरणातील ईश्र्वर मकवाना व त्याच्या साथीदारांना याच पोलिसांनी अटक केली होती.
चार दिवस होता रेल्वे स्टेशन परिसरात वावरयंदा दक्षिण गोव्यात ज्या खूनाच्या घटना घडल्या त्यापैकी जवळपास सर्व गुन्हय़ांचा तपास लावण्यास पोलीस यशस्वी ठरले होते. मात्र कुडचडे येथील सुकोरिना त्रवासो या महिलेच्या खुन्याचा तपास काही केला लागत नव्हता. त्यामुळे दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी रेल्वेच्या एलआयबी पथकाला सतर्क केले होते. सदर संशयिताचा फोटो या एलआयबी पथकाला देण्यात आला होता. या पथकाने मडगाव रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या आपल्या खब:यांर्पयत हा फोटो पोहोचविला होता. चार दिवसांपूर्वी संशयितासारखी दिसणारी एक व्यक्ती रेल्वे परिसरात वावरत असल्याची माहिती या खब:यांकडून या पथकाला मिळाली होती. मात्र त्याविषयी खात्री होत नव्हती. सोमवारी रात्रीच्यावेळी फोटोसारखी दिसणारी एक व्यक्ती जुन्या रेल्वे स्थानकात घुसल्याची माहिती खब:यांकडून या पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी पाळत ठेवली. मात्र तासभर होऊनही संशयित काही त्यांच्या हाती लागत नव्हता. शेवटी तो रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर आल्याचे त्यांना दिसल्यावर त्यांनी लगेच त्याला जेरबंद केले.