पणजी : गोव्यात उद्या शनिवारपासून तीन दिवस किंग मोमोची राजवट असेल. खा, प्या आणि मजा करा असा संदेश देणारा कार्निव्हल उद्या शनिवारपासून सुरू होत आहे. तथापि, देशातील सध्याची स्थिती पाहता कार्निव्हल किंवा वाईन महोत्सव सरकारने साजरा करणे किती योग्य असे पत्रकारांनी भाजपाच्या नेत्यांना विचारले असता, सध्या भारत-पाक युद्ध होत असल्याने कार्निव्हलसारखे महोत्सव साजरे करण्यामध्ये काही गैर नाही, असे त्यांनी सांगितले.पणजी शहरात शनिवारी कार्निव्हलची मिरवणूक होईल. मिरामार सर्कल ते दोन पावलांपर्यंत कार्निव्हलनिमित्त सायंकाळी साडेतीन ते चारच्या सुमारास चित्ररथ मिरवणूक होईल. मग सलग तीन-चार दिवस अन्य शहरांमध्ये कार्निव्हलच्या मिरवणुका होतील. संपूर्ण देश पुलवामामध्ये गमावलेल्या 40 जवानांच्या शोकसागरात आणि सीमेवरील तणावाच्या वातावरणात असताना गोव्यात मात्र पर्यटनाच्या नावाखाली खा, प्या आणि मजा करा या संदेशाचे चाळे चालवू देणा-या गोवा सरकारचा आम्ही तीव्र निषेध करतो, असे गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी म्हटले आहे.भाजपचे नेते व वीजमंत्री निलेश काब्राल यांना पत्रकारांनी याविषयी विचारले असता, काब्राल म्हणाले की कार्निव्हल वगैरे उत्सव म्हणजे सांस्कृतिक उपक्रम आहेत. भारत-पाक युद्ध जर आता असते तर आम्हालाही असे सगळे उपक्रम थांबविणे योग्य वाटले असते. मात्र देशात सध्या युद्धाची स्थिती नाही. त्यामुळे आम्ही उपक्रम थांबविण्याचे कारण नाही. देशात अनेक सोहळे सध्या सुरू आहेत. त्यात काही गैर नाही. विरोधकांकडून ज्या भावना व्यक्त केल्या जातात, त्या भावना काही सर्व लोकांच्या नव्हे. भाजपचे प्रवक्ते दत्तप्रसाद नाईक यावेळी म्हणाले, की केंद्र सरकार दहशतवादाचा बिमोड करील. देशातील सगळे व्यवहार ठप्प व्हावेत असा दहशतवाद्यांचा हेतू असतो. आम्ही तो हेतू साध्य होऊ देत नाही.
गोव्यात शनिवारपासून किंग मोमोची राजवट, युद्ध नसल्याने कार्निव्हलला आक्षेप नाही : भाजप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2019 9:09 PM