पणजी : क्राईम ब्रँचचे वकील गुरुप्रसाद कीर्तनी यांनी लुईस बर्जर लाच प्रकरणातून बाजूला होण्याचा निर्णय घेतला असला तरी क्राईम ब्रँचकडून त्यांची मनधरणी अजून सुरू आहे. ते निर्णय मागे घेतील याबद्दल क्राईम ब्रँचला विश्वास आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारीही क्राईम ब्रँचकडून कीर्तनी यांचे मन वळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. ते क्राईम ब्रँचसोबत आहेत, अशी माहिती एका बड्या अधिकाऱ्याने दिली. आपण क्राईम ब्रँचबरोबरच असल्याचे कीर्तनी यांनी माध्यमांना सांगितले; परंतु आपल्याजवळ अनेक खासगी प्रकरणे असल्यामुळे आपण वेळ देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. क्राईम ब्रँचतर्फे युक्तिवाद चालू ठेवणार की नाही, या बाबतीत त्यांनी काहीच स्पष्ट केले नाही. कीर्तनी यांनी क्राईम ब्रँचतर्फे विशेष न्यायालयात युक्तिवाद करण्यापूर्वी या प्रकरणाचा पूर्ण अभ्यास केला होता. त्यांनी या प्रकरणातून माघार घेतली ती दिगंबर कामत, चर्चिल आलेमाव आणि आनंद वाचासुंदर या वजनदार संशयितांच्या प्रकरणात युक्तिवाद पूर्ण झाल्यावर. त्यापैकी चर्चिल आणि वाचासुंदर यांच्या बाबतीत ते यशस्वी ठरल्याचे सोमवारी न्यायालयाने दिलेल्या निवाड्यातून सिद्ध झाले. दोघांनाही न्यायालयाने जामीन नाकारला. दिगंबर कामत यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर निवाडा बुधवारी होणार आहे. यानंतरचे या तिघांच्या बाबतचे युक्तिवाद उच्च न्यायालयात होण्याची शक्यता आहे; कारण वाचासुंदर आणि चर्चिल यांना जामिनासाठी उच्च न्यायालयात जावे लागेल. कामत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला तर त्यांनाही उच्च न्यायालयात जावे लागेल हे निश्चित आहे. (खास प्रतिनिधी)
क्राईम ब्रँचतर्फे कीर्तनी यांची मनधरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2015 1:43 AM