लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : प्रत्येक शेतकऱ्याने किसान क्रेडिट कार्डचा लाभ घ्यावा. किसान क्रेडिट कार्ड हा शेतकऱ्यांचा कायदेशीर अधिकार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. नॅशनल बँक फॉर अॅग्रिकल्चर अॅण्ड रुरल डेव्हलपमेंट (नाबार्ड) तर्फे मंगळवारी शहरात आयोजित राज्य पतपुरवठा चर्चासत्राच्या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
नाबार्डच्या गोवा प्रादेशिक कार्यालयाने तयार केलेल्या स्टेट फोकस पेपर २०२४-२५चे अनावरण मुख्यमंत्र्यांनी केले. राज्यात भाताच्या उत्पादनात वाढ झाली असून, राज्यात तांदळाची प्रक्रिया करून निर्यात करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. नाबार्ड बँकेच्या कार्याची प्रशंसा करून नाबार्ड बँकेचा खासकरून राज्याच्या ग्रामीण भागात प्राथमिक सुविधा निर्माण करण्यासाठी सतत हातभार लागला. कृषी आणि इतर उपक्रमांमध्ये कौशल्य वाढविण्यासाठी नाबार्डचे मौल्यवान योगदान आहे. नाबार्डने कृषिक्षेत्राच्या विकासासाठी फक्त आर्थिकच नव्हे, तर ज्ञानसंस्था म्हणूनही योगदान दिले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
प्रधान सचिव (वित्त) डॉ. व्ही. कांदवेलू यांनी नाबार्ड बँकेने राज्यातील महिला बचतगटांना कर्ज सुविधा उपलब्ध केल्यामुळे बँकेची प्रशंसा केली. नाबार्डच्या गोवा कार्यालयाचे महाव्यवस्थापक डॉ. मिलिंद भिरुड यांनी स्वागत केले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डिचोली प्रोग्रेसिव्ह शेतकरी उत्पादक संस्थेचे विश्वंभर गावस, पेडणे तालुका शेतकरी उत्पादक संस्थेचे उदय प्रभुदेसाई, बार्देश तालुका शेतकरी उत्पादक संस्थेचे सुदेश मयेकर, तिसवाडी तालुका शेतकरी उत्पादक संस्थेचे प्रेमानंद म्हांबरे आणि सत्तरी तालुका शेतकरी उत्पादक संस्थेचे आत्माराम शेट्ये यांचा सत्कार केला.