लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कोकण रेल्वे मार्गावरील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करण्यात आली आहेत. मागील बारा वर्षांच्या कालावधीत कोकण रेल्वेकडून सुरक्षिततेच्या केलेल्या उपाययोजनांमुळे मोठा अपघात झालेला नाही. यावर्षीही रुळानजीक नालेसफाई, झुडपांची तोड व दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती कोकण रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.
जूनपासून पावसाळी वेळापत्रक लागू झाले आहे. यावर्षी कोकण रेल्वेमार्गावर गस्तीसाठी ६७२ कर्मचारी नियुक्त केलेले आहेत. कोकण रेल्वेच्या ७४० किमी मार्गावर नियोजित सुरक्षा कामे करण्यात आली आहेत. या मार्गावरील ९ ठिकाणी रेल्वे मेंटेनन्स गाड्या असतील. टॉवर वेंगन मडगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली करमळी, कारवार, उडपी येथे असतील.
मुसळधार पावसात गाड्यांचा वेग ४० किमी प्रतितास ठेवण्याच्या सूचना केलेल्या आहेत. आपत्कालीन वेळेसाठी वेर्णा व रत्नागिरी येथे अपघात रिलीफ मेडिकल व्हॅन असतील. १०० मिमीपेक्षा जास्त पाणी पातळी वाढल्यास वाहतूक तात्पुरती रद्द करण्यात येईल. लोको पायलट व गार्डना वॉकीटॉकी देण्यात आले आहेत.
९ स्थानकांवर सेल्फ रेकॉर्डिंग पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. पुलांसाठी तीन ठिकाणी पूर चेतावणी देणारी यंत्रणा, तर चार ठिकाणी अॅनिमोमीटर बसवलेले आहेत. रुळानजीकच्या पाण्याच्या नाल्यांच्या साफसफाईकडे लक्ष देण्यात आले आहे. मागील काही वर्षांत रेल्वे मार्गावर भू- सुरक्षा कार्य राबवल्याने माती, दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये लक्षणीय घट झाली आहे.
गेल्या १० वर्षांत पावसाळ्यात रेल्वे सेवेत कोणताही मोठा व्यत्यय आलेला नाही. रेल्वे गाड्या सुरक्षितपणे चालवल्या जाव्यात, यासाठी कोकण रेल्वे विहित मार्गदर्शक तत्त्वांनुसार मान्सून पेट्रोलिंग केली जाते. वेर्णा येथे एआरटी (अपघात निवारण ट्रेन) सज्ज ठेवण्यात येते. आपत्कालीन परिस्थितीत श्रेणी नियंत्रण कार्यालय, स्थानकाशी संपर्क साधण्यासाठी सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना तत्पर ठेवण्यात येते, असे कळविण्यात आले.